सुलभ कर्ज योजनेमुळे ग्राहकांनी अधिक खरेदी केल्याचे निरीक्षण

ऑनलाइन बाजारपेठेत सध्या सुरू असलेल्या खरेदी जत्रेला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या वर्षी सुरू करण्यात आलेल्या ‘नो कॉस्ट ईएमआय’ सुविधेला ग्राहक सर्वाधिक पसंती देत असल्याचे ऑनलाइन विक्रेत्यांनी सांगितले. याचबरोबर विविध बँकांच्या रोकड परतावा आणि अन्य सवलत योजनांमुळे ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडणारेही कमी झाल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदविले आहे.

सणांच्या पाश्र्वभूमीवर घटस्थापनेपासून ऑनलाइन बाजारपेठेत विविध ई-व्यापार संकेतस्थळांनी ऑनलाइन खरेदी महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव दरवर्षीच भरत असल्यामुळे यामध्ये संकेतस्थळांमध्ये चढाओढ लागली आहे.त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. यात सवलतीबरोबरच पैसे भरण्यासाठीही सुलभ कालावधी मिळू लागल्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त खरेदी करण्याचे धाडसही केले आहे. सवलतींबरोबरच या वर्षी अनेक ई-व्यापार संकेतस्थळांनी काही उत्पादने केवळ त्यांच्याच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच संकेतस्थळांवर या वर्षी ‘नो कॉस्ट ईएमआय’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये या संकेतस्थळांचे ज्या बँकांशी किंवा वित्तपुरवठा कंपन्यांशी सहकार्य करार आहेत, त्या कंपन्यांकडून ग्राहकांना सुलभ हप्त्यावर वस्तू खरेदी करता येत आहेत. काही योजनांमध्ये तर आत्ता खरेदी केलेल्या वस्तूचे हप्ते चक्क जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहेत.
यामुळे या वर्षी ग्राहकांनी या पर्यायाचा जास्तीत जास्त स्वीकार केल्याचे निरीक्षण ई-विक्रेता संघाचे संजय ठाकूर यांनी सांगितले.

याचबरोबर कंपन्यांनी रोकडरहित व्यवहारांवर देऊ केलेल्या रोकड परताव्यासारख्या योजनांमुळे या वर्षी ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी झाल्याचे निरीक्षण ठाकूर यांनी नोंदविले, तर या ऑनलाइन विक्री महोत्सवातील सवलती इतक्या जास्त आहेत की उत्पादननिर्मितीच्या मूळ किमतीपेक्षाही कमी किमतीत विक्री होत आहे. याचा फायदा घेऊन अनेक ग्राहकांनी भविष्यात खरेदी करणाऱ्या अनेक वस्तू या महोत्सवात खरेदी करण्यास पसंती दिल्याचेही ते म्हणाले.

खरेदी महोत्सवात ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने यंदा अनेक सवलती देऊ केल्या आहेत. मोबाइल विभागात मूळ किमतीतील सवलत त्यानंतर जुन्या मोबाइललाही चांगली किंमत तसेच कार्डने पैसे भरल्यास रोकड परतावा अशा योजनांमुळे ग्राहकाला संकेतस्थळावरील नमूद सवलत किमतीपेक्षाही कमी किमतीत वस्तू मिळत आहे. याचबरोबर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या वर्षी ‘नो कॉस्ट ईएमआय’ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकाला कोणतीही रक्कम न भरता एका क्लिकवर कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. याचा फायदा जास्तीत जास्त ग्राहकांना होणार आहे.

– ऐय्यप्पन राजगोपाल, वरिष्ठ संचालक, फ्लिपकार्ट (मोबाइल विभाग)

खरेदी जत्रेला २०१४ आणि २०१५ मध्ये मिळालेल्या प्रतिसादाच्या तुलनेत यंदाचा प्रतिसाद काहीसा कमी असल्याचे म्हणता येईल. या वर्षी देऊ केलेली सवलत ही फारशी जास्त नाही. आयफोन, एचडी टीव्ही, लॅपटॉप्स, प्रिंटर्स या विभागातील सवलती तशा सुमार आहेत, पण ऑफलाइन बाजाराच्या तुलनेत नक्कीच फायदेशीर आहे. या वर्षी पहिल्या दोन दिवसांमध्ये खरेदीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दिसत असले तरी संकेतस्थळावर भेट देऊन वस्तूंची किंमत जाणून घेणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

– मेहुल जोबानपुत्रा, मुख्याधिकारी आणि सहसंस्थापक, देसीडाइम डॉट कॉम (ऑनलाइन ग्राहक समाज माध्यम)