कॉल ड्रॉप झाल्यावर कंपन्यांनी ग्राहकांना पैसे देण्याच्या नियमावर सरकार ठाम असल्याचे दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. मात्र कंपन्या हे दर थेट ग्राहकांवर लादण्याचा दावा करत आहेत यावर मात्र त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. यामुळे आता हा बोजा ग्राहकांवर येण्याची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्टने मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित केलेल्या ‘फ्युचर अनलिश्ड’ कार्यक्रमात प्रसाद यांनी गेल्या वर्षभरातील भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची माहिती उपस्थितांना करून दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कॉल ड्रॉपसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रसाद यांनी सरकार निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तसेच स्पेक्ट्रमच्या वाटपाबाबत नव्या मार्गदर्शिका तयार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रसाद यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांची भेट घेऊन देशभरात ब्रॉडब्रँड पोहोचविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत चर्चा केली.