गेल्या १० वर्षांमध्ये मुहूर्ताचे कागदी घोडे नाचवून चर्चगेट ते डहाणू उपनगरी रेल्वे सेवेचे स्वप्न दाखविणाऱ्या पश्चिम रेल्वेने डहाणूकरांचा अपेक्षाभंग केला. आता पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेने चर्चगेट-डहाणू उपनगरी रेल्वे सेवेच्या उद्घाटनासाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येचा म्हणजे १० एप्रिलचा मुहूर्त धरला आहे. मात्र अत्याधुनिक इशारा-ब्रेक यंत्रणा असलेली गाडी उपलब्ध झाल्यास या मुहूर्तावर चर्चगेट-डहाणू उपनगरी रेल्वेची लगीनघाई उरकण्यात येणार आहे. अन्यथा पुन्हा एकदा नवा मुहूर्त शोधण्याची वेळ रेल्वेवर येणार आहे.
चर्चगेट-डहाणूदरम्यान उपनगरी रेल्वे योजना २००२ मध्ये जाहीर करण्यात आली. ही गाडी २००७ मध्ये सुरू होणार असे त्यावेळी ठामपणे सांगण्यात आले होते. मात्र उपगनरी गाडी आणि लांब पल्ल्याची गाडी यांच्या डब्यांच्या रूंदीमुळे दोन्ही रेल्वे मार्गातील अंतर वाढविण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी २००७ चा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आणि नंतर दरवर्षी डिसेंबर अखेर ही गाडी सुरू होणार असे सांगण्यातच पश्चिम रेल्वेचे अधिकारी धन्यता मानत होते. या गाडीच्या उद्घाटनासाठी २०१० पासून दर सहा महिन्यांनी मुहूर्त जाहीर करून नंतर तो पुढे ढकलण्याची मालिकाच सुरू झाली. जादा गाडय़ा उपलब्ध नाहीत, बोरिवली ते विरार दरम्यान जादा गाडय़ा चालविण्यास प्राधान्य देणे, चर्चगेट-विरार दरम्यान विद्युतीकरणात झालेल्या बदलामुळे नव्या गाडय़ांची कमतरता आदी कारणांमुळे चर्चगेट-डहाणू उपनगरी रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरू शकले नाही. रेल्वेच्या अर्थसंकल्पानंतर या गाडीसाठी २९ मार्चचा मुहूर्त जाहीर करण्यात आला होता. अद्याप नव्या गाडय़ा उपलब्ध न झाल्याने आणि या मार्गावरील काही चाचण्या अपुऱ्या असल्याने २९ मार्चचा मुहूर्त रद्द करण्यात आला. आता एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात नवी गाडी उपलब्ध होईल आणि साधारणपणे १० एप्रिलपासून चर्चगेट-डहाणू उपनगरी रेल्वे सुरू होईल, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र त्याचवेळी चर्चगेट-डहाणू गाडीमध्ये स्वयंचलित इशारा यंत्रणा (ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टीम) बसविण्यासाठी काही काळ लागणार असल्याने आता हा मुहूर्तही पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.