१३ बारवर कारवाई; ९५ मुलींची सुटका, ३०० जणांवर गुन्हे

मुंबईत ‘ऑर्केस्ट्रा बार’च्या नावाखाली छुपे डान्सबार सुरूच आहेत. परंतु, गेल्या २५ दिवसांत पोलिसांनी या बारवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘ऑर्केस्ट्रा बार’च्या नावाखाली नाचगाण्यांना व नोटा उडवणाऱ्यांना मुक्त वावर देणाऱ्या १३ बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या बारमधून तब्बल ९५ मुलींची सोडवणूक पोलिसांच्या समाजसेवा शाखेने केली असून ३०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मे २०१६ मध्ये डान्सबारला परवानगी देताना ‘महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे, मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यांना प्रतिबंधक घालणारा आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे जतन करण्याबाबतचा अधिनियम २०१६’ हा कायदा पारित करण्यात आला. नव्या कायद्यात डान्सबार किंवा मद्यपानगृहे चालविताना तेथे कोणकोणत्या बाबी असायला हव्यात याची नोंद केलेली आहे.  डान्सबारच्या मुसक्या आवळणारा हा नवा कायदा अंमलात आल्यापासून काही डान्सबार व्यावसायिक एकीकडे परवानग्यांच्या फेऱ्यात अडकले आहेत. दुसरीकडे ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रास नियम धाब्यावर बसवून डान्सबारप्रमाणेच सर्व ‘सेवा’ राजरोसपणे पुरविल्या जात आहेत. पोलिसांनी मुंबईतील नियम धाब्यावर बसविणाऱ्या तब्बल १३ बारवर कारवाई केली आहे. हे बहुतांश बार उपनगरातील आहेत.

विलेपाल्र्यामधील एका बारमध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालविला जात असल्याचे समाजसेवा शाखेला आढळून आले. ऑर्केस्ट्रा बारमध्ये मुलींनी रेकॉर्डेड गाण्यावर नाचणे, अश्लील हावभाव करणे, ग्राहकांनी मुलींसोबत नाचणे, त्यांच्यावर पैसे उधळणे यासारखे प्रकार सुरु असल्याचे दिसून आले.