तीन हजार कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा

मुंबई : पालिकेच्या ८० हजार कोटींच्या मुदत ठेवी बँकेत असल्या तरी प्रत्यक्षात पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपली हक्काची देणी वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. भविष्य निर्वाह निधी, निवृत्तिवेतन निधी व उपदान निधी मिळवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध कार्यालयांमध्ये खेटे घालावे लागत आहेत. आतापर्यंत किमान तीन हजार कामगार व कर्मचाऱ्यांची देणी थकीत आहेत.

पालिकेच्या ८० हजार कोटींच्या मुदत ठेवींपैकी १२ ते १३ हजार कोटी रुपये हे पालिका कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनासाठी, भविष्य निर्वाह निधीसाठी व विविध उपदाने, शिल्लक रजांचे रोखीकरण याकरिता राखीव आहेत. मात्र हा हक्काचा निधी कर्मचाऱ्यांना वेळेत मिळत नसल्याचे वास्तव आहे. पालिकेचे कर्मचारी, कामगार, अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना ही देणी मिळवण्यासाठी प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपली देणी मिळविण्यासाठी विविध विभागांत खेटे घालावे लागतात. तो कामगार ज्या विभागात काम करत असेल त्या विभागातून लेखा विभागात, तिथून माहिती तंत्रज्ञान विभागात, भायखळ्याला निवृत्तिवेतन विभागात, तर कधी पालिका मुख्यालयात सामान्य प्रशासन विभागात अशी कामगारांची फरपट सुरू असते. परंतु देणी काही मिळत नाहीत. ही देणी वेळेत मिळावीत व कामगारांची फरपट थांबवावी अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. पालिकेचे तब्बल तीन हजार सेवानिवृत्त कामगार हक्काच्या देयकांपासून वंचित असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केला आहे.

१८ टक्के व्याज देण्याची कामगार सेनेची मागणी

दरम्यान, एखादा कामगार सेवानिवृत्त होण्याच्या दिवशीच त्याची देणी त्याच्या खात्यावर जमा करावी, त्यादृष्टीने आधीच त्याच्या देय दाव्यांची पडताळणी करावी, अशी मागणी बाबा कदम यांनी केली आहे. तसेच ही देणी देण्यास विलंब होत असल्यास या रकमेवर दरवर्षी १८ टक्के दराने व्याज द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.