लोआयआयटी मुंबईच्या नोकरी मेळाव्याच्या (कॅम्पस प्लेसमेंट) पहिल्या टप्प्यात नोकरीच्या संधींमध्ये घट झाल्याचे दिसत असून ९४६ विद्यार्थ्यांनाच नोकरीची संधी मिळाली आहे. आतापर्यंत परदेशी कंपन्यांनी दिलेल्या नोकरीच्या प्रस्तावांमध्ये १.४० कोटी रुपये वार्षिक वेतन आणि भारतीय कंपन्यांमध्ये ६४ लाख रुपये वार्षिक वेतन सर्वाधिक ठरले आहे.

देशभरातील आयआयटीमध्ये डिसेंबर महिन्यात नोकरी मेळावे होतात. यंदा हे मेळावे ऑनलाइन होत आहेत. आयआयटी मुंबईत या मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्यांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. आयआयटी मुंबईत पहिल्या टप्प्यात ३१० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात मायक्रोसॉफ्ट, गूगल, टेक्सास इन्स्ट्रमेंट्स, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, अ‍ॅपल आदी कंपन्यांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात सहभागी कंपन्यांकडून ११२८ नोकऱ्यांचे प्रस्ताव देण्यात आले. यापैकी ९७३ विद्यार्थ्यांनी हे प्रस्ताव स्वीकारले आहेत. त्यापैकी १८२ मेळावा सुरू होण्यापूर्वी कंपन्यांनी प्रस्ताव दिले होते. मेळाव्यामध्ये ९४६ विद्यार्थ्यांना प्रस्ताव देण्यात आले.

यंदाच्या वर्षांत सर्वाधिक संधी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी दिल्या आहेत. सरासरी वेतन संशोधन आणि विकास क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये अधिक (२२.७२ लाख वार्षिक) असल्याचे दिसत आहे. त्याखालोखाल माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी सरासरी वेतन दिले असून ते २२.३५ लाख वार्षिक असे आहे. एकूण ५८ आंतरराष्ट्रीय संधी मिळाल्या आहेत. यामध्ये अमेरिका, जपान, यूएई, सिंगापूर, नेदरलॅण्ड्स, हाँगकाँग आणि तैवान या देशांचा समावेश आहे.