वांद्रे टर्मिनस येथे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठी (२५) या तरुणीचे शनिवारी संध्याकाळी बॉम्बे रुग्णालयात निधन झाले. महिन्याभरापासून तिच्यावर उपचार सुरू होते. अनेक अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नौदलच्या रुग्णालयात नोकरीसाठी रुजू होण्यासाठी हरयाणाची प्रीती राठी दिल्लीहून २ मे रोजी मुंबईत आली होती. गरीबरथ एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात ती कुटुंबियासमवेत उतरत असताना पंचविशीतल्या एका तरुणाने तिच्या चेहऱ्यावर जवळून अ‍ॅसिड फेकले होते. सुरवातीला तिला भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल केले होते. या अ‍ॅसिड हल्ल्यात तिने डावा डोळा गमावला होता. तर उजव्या डोळ्याची दृष्टीही कमकुवत झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर तिला पंधरा दिवसांपूर्वी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १७ डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते. अ‍ॅसिड पोटात गेल्याने तिची अन्ननलिका जळाली होती. तसेच तिचे एक फुफ्प्फुसही निकामी झाले होते. दररोज रक्तस्त्राव होत असल्याने तिला दररोज पाच ते सहा बाटल्या रक्त चढविण्यात येत होते. प्रकृती सुधारत नसल्याने तिच्यावर मोठी शस्त्रक्रियादेखील शक्य होत नव्हती. त्यातच मूत्रपिंडाचाही त्रास सुरू झाला होता व हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी झाले होते.
बुधवारपासून तिची प्रकृती खालावली व शनिवार सकाळपासून ती अधिकच बिघडली. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तिला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला, परंतु दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
.. जगण्याची आस अपुरी राहीली
२ मे रोजी अ‍ॅसिड हल्ला झाल्यानंतर प्रितीला भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती बोलू शकत नव्हती. तेव्ही ती चिठ्ठी लिहून संवाद साधत होती. आई बाबा तुम्ही काळजी करु नका, माझी नोकरी मिळेल ना़  असे तिने विचारले होते. जेव्हा ती बॉम्बे हॉस्पीटलमध्ये आली तेव्हापासून तिची प्रकृती बिघडली होती आणि ती चिठ्ठीही लिहू शकत नव्हती. शेवटच्या चिठ्ठीत तिने माझा चेहरा ठीक होईल ना, मी कुणाचं काय वाईट केलं होतं असा आर्त सवाल केला होता. पी्रतीची प्रकृती खालावू लागल्याने तिच्या कुटुंबियांनी महायज्ञाचेही आयोजन काही दिवसांपूर्वी केले होते.
खरा हल्लेखोर कोण?
रेल्वे पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी हरयाणा येथील पवनकुमार गेहलून या तरुणाला अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हल्ल्यामागची त्याची भूमिका अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेली नाही. तो प्रीतीचा मित्र होता आणि ज्या नरेला भागात ती रहात होती तेथेच तो शिक्षणासाठी होता. हल्ल्यानंतर त्याने पी्रतीच्या बहिणीकडे विचारपूस करणारे फोनही केले होते. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. पण पवनकुमार हा खरा आरोपी नाही, असे प्रीतीचे कुटुंबिय सांगत आहेत.