दिल्लीत करोना संसर्गाचा प्रसार झपाटय़ाने वाढत असून बाधितांची संख्या मुंबईपेक्षा जवळपास १५ हजाराने अधिक नोंदली गेली आहे. दिल्लीची रुग्णसंख्या लवकरच एक लाखाचा टप्पा गाठणार आहे. दिल्लीत मुंबईच्या तुलनेत चाचण्या होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेही करोना रूग्णांचे निदान होण्याऱ्या रूग्णांची संख्या अधिक असावी, असा अंदाज आहे.

करोना संसर्गाचा प्रसारात सुरुवातीपासून अग्रेसर असलेल्या मुंबईला आता दिल्लीने मागे टाकले आहे. ५ जूनला मुंबईची रुग्णसंख्या ४४,९३१ होती. त्यावेळी दिल्लीमध्ये २५,४०० रुग्ण होते. महिनाभरात मुंबईची रुग्णसंख्या दुपटीने वाढत ८२,२३७ नोंदली गेली. तेव्हा दिल्लीच्या रुग्णसंख्येत मात्र जवळपास चौपटीने वाढ होत ती ९७,२०० वर पोहचली. तसेच मृतांच्या नोंदीचा आलेखही ६०५ वरून तब्बल ३००४ वर गेला आहे.

दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही मुंबईच्या तुलनेत दुपटीने अधिक आहे. मुंबईत दरदिवशी जवळपास १२०० रुग्णांचे निदान होते. तर दिल्लीमध्ये ही संख्या सुमारे २ हजार आहे. दरदिवशी नोंदल्या जाणाऱ्या मृतांची संख्या मात्र तुलनेने कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे.

दिल्लीत प्रतिजन चाचण्या सुरू

दिल्लीत प्रतिजन(अ‍ॅण्टीजेन) चाचण्या सुरू झाल्या असून ५ जुलैला एका दिवसात १३,२६३ चाचण्या केल्या गेल्या. मुंबईत अद्याप या चाचण्या सुरू झालेल्या नाहीत.

दिल्लीत चाचण्या दुप्पट

मुंबईच्या तुलनेत दिल्लीत करोना चाचण्यांची संख्या दुप्पट आहे. मुंबईत आत्तापर्यत ३,५४,६४९ चाचण्या केल्या आहेत, तर दिल्लीत ६,४३,५०४ चाचण्यांची नोंद आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे मुंबईत २७,२६५ चाचण्या तर दिल्लीमध्ये ३३,८६८ चाचण्या केल्या गेल्या. मुंबईत दर दिवशी जवळपास साडेचार हजार केल्या जात असून दिल्लीत ही संख्या नऊ हजाराहून अधिक आहे.