वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांतील वाद;  झोपुच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम 

झोपडपट्टी पुनर्वसन योजना जलदगतीने मार्गी लागाव्यात, याबाबत आग्रही असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना छेद देण्याचा प्रयत्न सध्या शासनात सुरू आहे. दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादामुळे झोपु प्राधिकरणातील १२ अभियंत्यांच्या नियुक्त्या गेल्या आठ महिन्यांपासून रखडल्या आहेत. परिणामी अभियंत्यांच्या नियुक्त्या होऊ न शकल्याने झोपु प्राधिकरणातील नस्ती निकालात निघण्याचा वेगही मंदावला आहे.

झोपु प्राधिकरणात पालिका वा म्हाडातून अभियंते प्रतिनियुक्तीवर नेमले जातात. महापालिका आयुक्त, गृहनिर्माण सचिव, झोपु प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे संचालक तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष सदस्य असलेल्या समितीमार्फत अभियंत्यांची निवड केली जाते. या छाननी समितीने निवड केलेल्या अभियंत्यांच्या नियुक्त्यांना शासनाकडून मंजुरी घेतली जाते. १२ अभियंत्यांना तातडीने ‘झोपु’त पाठविण्याबाबत पालिकेला दोन-तीन वेळा स्मरणपत्रे पाठविण्यात आली; परंतु छाननी समितीने निवडलेल्या अभियंत्यांऐवजी पालिकेकडून अन्य १२ अभियंत्यांची यादी गृहनिर्माण विभागाला पाठविण्यात आली. त्यामुळे या अभियंत्यांना रुजू करून घेण्यास गृहनिर्माण विभागाचे विद्यमान प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी नकार दिला. पालिकेने ज्या १२ अभियंत्यांची यादी गृहनिर्माण विभागाला पाठविली आहे, ती यादी छाननी समितीने दिलेल्या मंजुरीव्यतिरिक्त आहे.

शासनाचा आदेश न पाळता पालिकेने आपल्या मर्जीने अन्य अभियंत्यांची नावे पाठविली असून त्यांना रुजू कसे करून घेणार, असा सवाल या प्रकरणी संपर्क साधला असता गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी केला.

छाननी समितीत स्वत: पालिका आयुक्त असतात. तत्कालीन पालिका आयुक्तांनी या यादीला हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर मुख्यमंत्री तसेच गृहनिर्माणमंत्र्यांची रीतसर मंजुरी घेऊन नियुक्तीचा प्रस्ताव पालिकेला पाठविण्यात आला आहे. अशा वेळी तेच अभियंते न पाठविणे हा शासनाच्या आदेशाचा भंग आहे, असेही सिंग यांनी सांगितले. या प्रकरणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, ही बाब वस्तुस्थितीला धरून नाही, असे त्यांनी सांगितले.

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अभियंते

संजय बोरसे, एस. एस. कासुल्ला, पी. एस. भोईर, आर. एच. पुजारी, एच. व्ही. गायकवाड, ए. ए. पावसकर, सी. आर. अल्ले, एस. एस. सानप, आर. डी. राठोड, आर. व्ही. काबंळे, एस. के. उबाळे आणि एस. एस. शिंदे.

इमारत प्रस्ताव आणि झोपुतील नियुक्त्यांसाठी अभियंत्यांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षार्थी अभियंत्यांची गुणवत्तेनुसार यादी तयार केली जाते. गृहनिर्माण विभागाने जी यादी पाठविली त्या अभियंत्यांना अगोदरच इमारत प्रस्ताव विभागात नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे गुणवत्तेनुसार अन्य अभियंत्यांची नावे पाठविण्यात आली.  – अजोय मेहता, आयुक्त