देवेंद्र फडणवीस यांच्या नियुक्तीने भाजपमधील गोपीनाथ मुंडे विरुद्ध नितीन गडकरी हा वाद पुन्हा एकदा खुला झाला आहे. स्वच्छ प्रतिमा, व्यासंगी वक्तृत्व आणि तरुण व्यक्तिमत्त्व या मुद्यांवर फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षपदी सरशी साधली. मात्र त्याचबरोबर जातीपाती आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्नही या निवडीतून भाजप श्रेष्ठींनी केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हा महत्वाचा प्रश्र होता. गडकरी व मुंडे गटाने आपापल्या तलवारी परजल्याने आणि एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न केल्याने फडणवीस की सुधीर मुनगंटीवार हा प्रश्न प्रतिष्ठेचा झाला होता. त्यातच सुरवातीला एकनाथ खडसे आणि शेवटच्या टप्प्यात विनोद तावडे यांच्या नावाचे घोडे पुढे दामटण्यात आल्याने ऐनवेळेपर्यंत नेमक्या कोणाची नियुक्ती होईल, ऐनवेळी कोणाच्या बाजूने पारडे फिरेल, याचे आडाखे बांधण्यात येत होते. फडणवीस हे विदर्भातील ब्राह्मण नेते असून  विरोधी पक्षनेतेपदी खान्देशातील लेवा पाटील-खडसे व कोकणातील मराठा समाजाचे तावडे आणि निवडणुकांसाठी पक्षाचे नेतृत्व मराठवाडय़ातील व ओबीसींचे नेते मुंडे यांच्याकडे आहे.
यातून जातीपातीचा आणि विभागांचाही योग्य समतोल राखला जाईल, असे राजकीय गणित भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी फडणवीस यांच्या नियुक्तीतून साधले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षातील मतभेदांना फाटा देवून सर्वाना बरोबर घेवून जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हानाला आक्रमकपणे तोंड देईल आणि शिवसेना, रिपब्लिकन पक्षाशी समन्वय ठेवेल, अशा अध्यक्षांची आवश्यकता भाजपला होती. गडकरी व मुंडे या दोघांबरोबरच त्यांच्या गटातील नेत्यांशीही योग्य संवाद ठेवण्याची कसरत फडणवीस यांना करावी लागणार आहे.
कोणतेही आरोप नसलेला, आक्रमकपणे किल्ला लढविणारा तरूण नेता अशी फडणवीस यांची ओळख असून निवडणुकीसाठी पक्षाला चैतन्य देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागेल.