संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : देशात व महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कर्करोगाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत असून योग्य वेळेत या रुग्णांचे निदान करून कर्करोगाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. याअंतर्गत तब्बल १५० ग्रामीण रुग्णालयात स्तन, मुख तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निदानाची व्यवस्था केली जाणार आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात तंबाखू सेवनामुळे पुरुष तसेच स्त्रियांमध्ये तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण मोठे आहे. याशिवाय स्तनाचा तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाणही देशात व राज्यात सर्वाधिक आहे. आरोग्य विभागाने २०१७ पासून कर्करुग्णांवरील उपचाराचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यास सुरुवात केली आहे. काही जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी व्यवस्था करण्यात आली आहे, तर टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने ‘कॅन्सर वॉरियर्स’ संकल्पनेच्या माध्यामातून काही हजार कर्करुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

शहरी भागातील रुग्णांमध्ये जी जागरुकता व आरोग सुविधा उपलब्ध असते तशी ती ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे बहुतेकवेळा शेवटच्या टप्प्यात कर्करोग झाल्याचे रुग्णाच्या लक्षात येते. अशा रुग्णांवर उपचार करणे हे एक आव्हान ठरते. यामुळे वेळेत कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी आरोग्य विभागाने तब्बल १५० ग्रामीण रुग्णालयांमध्ये कर्करोग निदान केंद्र सुरू करण्याची योजना आखली आहे. यासाठी या सर्व दीडशे रुग्णालयात स्तन, गर्भाशय तसेच तोंडाचा कर्करोगाचे निदान करणारी यंत्रणा लागू केली जाणार आहे. यात सोनोग्राफी मशीनमध्ये ब्रेस्ट प्रोब, बायोप्सी सुविधा, हिस्टोपॅथॉलॉजी सुविधा दिली जाणार आहे. तसेच येथील कर्मचाऱ्यांना यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. १२ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून याच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील कर्करुग्णांचे वेळेत निदान होईल. तसेच उपचाराचीही व्यवस्था करता येईल.

’ जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार भारतात जवळपास साडेबारा लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत.

’ सुमारे आठ लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला असून देशात २५ लाख रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

’ ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च’च्या अहवालानुसार देशात वेगाने वाढणारे कर्करुग्णांचे प्रमाण लक्षात घेता आणखी ५५० कर्करोग उपचार केंद्रांची आवश्यकता आहे. पाच हजार कॅन्सरतज्ज्ञाची गरज आहे.

’ २०२० मध्ये तंबाखू सेवनामुळे सुमारे सव्वादोन लाख पुरुष व ९३ हजार महिलांना कर्करोग झाला.

’ स्तनाच्या कर्करुग्णांची संख्या एक लाख ६५ हजार तर गर्भाशयीच्या कर्करुग्णांची संख्या सव्वा लाख एवढी आहे.