शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी २० हजार चालकांकडून सुविधेचा लाभ

मुंबई: ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर डिजिटल स्वाक्षरी करण्याची सुविधा नसल्याने वाहन चालक-मालकांना नाइलाजाने कार्यालयात येऊन कागदपत्रे सादर करावी लागतात. यातून सुटका करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रायोगिक तत्त्वावर शिकाऊ लायसन्स (अनुज्ञप्ती) अर्जासाठी डिजिटल स्वाक्षरीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. गेल्या दहा ते बारा दिवसांत साधारण २० हजार चालकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. आता लवकरच पक्के लायसन्स प्रक्रि या व अन्य सेवांसाठीही अशा प्रकारच्या स्वाक्षरीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आरटीओ कार्यालयात नवीन लायसन्स आणि परवाना, वाहन नोंदणी, वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर बदली करणे इत्यादींसाठी चालक-मालकांची दिवसभर ये-जा सुरू असते. कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी म्हणून आरटीओने ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध केली आहे. आरटीओच्या विविध प्रकारच्या ११० सेवा असून त्यातील महत्त्वाच्या आणि तेही चालकांशी संबंधित बहुतांश सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. सेवा ऑनलाइन झाल्यामुळे लायसन्स (अनुज्ञप्ती), परवाना (परमिट) इत्यादींचे अर्ज त्यावर उपलब्ध झाले. त्यामुळे कार्यालयात जाऊन अर्ज मिळवण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचला. मात्र ऑनलाइन सेवेत अर्जावर डिजिटल स्वाक्षरीची सुविधा नव्हती. त्यामुळे अर्जाची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून तो पुन्हा सादर करण्यासाठी आरटीओत जावे लागते. परिणामी त्यात वेळही जातो.

यातून सुटका करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने डिजिटल स्वाक्षरीची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू होते. प्रथम शिकाऊ लायसन्ससाठी दहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या सेवेचा लाभ राज्यात २० हजार चालकांनी घेतला आहे. डिजिटल स्वाक्षरी करून आरटीओत ऑलनाइन अर्ज सादर करण्यात आले आहेत. यात मुंबई महानगरातून सर्वाधिक अर्ज अशा प्रकारे असल्याचे सांगितले. या सेवेत सुरुवातीला तांत्रिक अडथळे येत होते. बराच वेळ स्वाक्षरी न होणे, स्वाक्षरी झाली तरी ती न दिसणे व अचानक पुढील अर्जप्रक्रि या सुरू होणे इत्यादी तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्या असून आता ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अनेक कामांसाठी डिजिटल स्वाक्षरी

आता पक्के  लायसन्स व परवाना, त्याची हुबेहूब प्रत मिळवण्यासाठी के ले जाणारे अर्ज, कागदपत्र हस्तांतर इत्यादींसाठीही डिजिटल स्वाक्षरी सुविधा सुरू होणार आहे. यात पक्क्या  लायसन्सबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर झाला असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यासाठीही सेवा सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डिजिटल स्वाक्षरीसाठी वाहन चालक-मालकाला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे.