News Flash

तारांकित, वलयांकित अन् कृतार्थतेचा स्पर्श..

जितेंद्र जोशी यांच्या खुमासदार सूत्रसंचालनानेही कार्यक्रमाची रंगत अखेपर्यंत कायम ठेवली होती.

राजकारण, कला, उद्योग, नाटक, चित्रपट अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीत शनिवारी मुंबईत ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा रंगला.

राजकारण, कला, उद्योग, नाटक, चित्रपट अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीत शनिवारी मुंबईत ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’च्या रंगलेल्या सोहळ्यात भविष्य घडविण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईच्या मनाला कृतार्थतेचा स्पर्श देणाराच होता. ‘आयटीसी ग्रॅण्ड मराठा’च्या तारांकित वातावरणात वलयांकित कर्तृत्ववंतांची मांदियाळीच जमल्याने सुरुवातीपासूनच या सोहळ्याला वेगळीच उंची लाभली होती.

कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवून समाजापुढे आणि विशेषत: आजच्या तरुणांपुढे स्वत:चा आदर्श निर्माण करणाऱ्या या बारा लखलखत्या तरुणांच्या नावाची घोषणा होत असताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली. ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवरून सोहळ्याचे थेट प्रसारण करण्यात आल्याने महाराष्ट्रासह देश आणि विदेशांतील मराठीजनांना हा शानदार सोहळा अनुभवता आणि पाहता आला.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्यूजन संगीतकार आणि की बोर्डवरील शास्त्रीय संगीताचे वादक अशी ओळख असलेले अभिजित पोहनकर आणि राजस्थानी लोकगायक मंगलियार यांच्या गायन-वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि तरुण तेजांकित पुरस्कार वितरण सोहळ्यात रंग भरला गेला.

या पुरस्कारामागची संकल्पना स्पष्ट करताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले की, प्रत्येकवेळी आपल्याला भूतकाळात रमण्याची सवय असते.

त्या सवयीचे खंडन करतानाच भविष्यात काहीतरी घडवू पाहणाऱ्या आणि त्यासाठी आज कार्यरत असणाऱ्या तरुण पिढीची समाजाला ओळख करून देणे गरजेचे होते. आणि त्या विचारातूनच या पुरस्काराचा पाया घातला गेला. आपल्या मनोगताचा प्रारंभ कुबेर यांनी बेगम अख्तर यांच्या ‘सितारों के आगे जहाँ और भी है,’ या गज़्‍ालच्या पंक्तीनं केला आणि ही युवापिढी आकाशापलीकडेही झेपायला तयार असल्याचे सूचित केले.

चाळीस वर्षांच्या आतील तरुणांकडून ‘लोकसत्ता’ने स्वनामांकन पत्र मागविले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे स्वनामांकन पत्रे ‘लोकसत्ता’कडे आली त्यातून बारा जणांची अंतिम निवड करण्यात आली. ही नावे जसजशी जाहीर होत होती तसतसे उपस्थितांमधले औत्सुक्य शमत होते आणि कौतुकभाव वाढतही होते. जितेंद्र जोशी यांच्या खुमासदार सूत्रसंचालनानेही कार्यक्रमाची रंगत अखेपर्यंत कायम ठेवली होती.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्या शास्त्रीय गायनाने सोहळ्याची सुरेल सांगता झाली. पं. पोहनकर यांचे सूर कानात साठवत आणि बारा तरुण तेजांकितांच्या कर्तृत्वाला सलाम करत उपस्थित श्रोते मार्गस्थ झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 4:54 am

Web Title: dignitaries from various sector present in loksatta tarun tejankit awards
Next Stories
1 आठवडाभरात मुनगंटीवार-ठाकरे चर्चा
2 आता डबल डेकर एसटी?
3 आमदारांची सहल ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला
Just Now!
X