ठाणे येथे प्रथमच होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर यजमान असलेल्या ठाणेकरांची संस्कृती व नाटय़प्रेम व्यक्त करणारे ‘सूर झाले चांदणे’ हे संमेलन गीत संमेलन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असले तरी ते प्रदर्शित करावे की नाही यावरून आयोजक व गीताचे गीतकार- संगीतकार यांच्यात वाद निर्माण झाला आहे. ठाण्यात १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी आयोजकांकडून संमेलनपूर्व निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत नाटय़रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आता संमेलनासाठी तयार करण्यात आलेले संमेलन गीत कधी प्रदर्शित करण्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
अखिल भारतीय नाटय़परिषदेच्या ठाणे शाखेने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी घेत नाटय़संमेलन उत्साह व थाटामाटात करण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस प्रयत्नही चाललेले दिसत आहेत. यासाठी संमेलनपूर्व कार्यक्रम, नाटके, एकांकिकांच्या प्रयोगांचे आयोजन करून वातावरणनिर्मिती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आयोजकांकडून १ फेब्रुवारीला श्रीराम भिडे यांच्याकडे संमेलन गीत तयार करण्यास सांगितले गेले होते. त्यानुसार भिडे यांनी विनोद पितळे यांनी लिहिलेले ‘सूर झाले चांदणे’ हे गीत ६ फेब्रुवारीलाच तयार केलेले आहे; परंतु अद्याप ते प्रदर्शित करण्यात आलेले नाही. ठाण्यात पहिल्यांदाच नाटय़संमेलन होत असल्याने ठाणेकर रसिकांचे नाटय़प्रेम, यजमान म्हणून ठाणेकरांची कलाप्रेमी संस्कृती व्यक्त करणारे व नाटय़रसिकांचे स्वागत करणारे हे गीत आयोजकांच्या सांगण्यावरून बनवले असून हे गीत संबंधितांना ७ फेब्रुवारीलाच ऐकवले होते; परंतु, आयोजकांकडून हे गीत अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे गीताचे निर्माते श्रीराम भिडे यांनी सांगितले.