दिवावासियांच्या अनेक दिवसांची प्रतिक्षा अखेर रविवारी संपणार असून दिवा स्थानकात जलद गाडय़ा थांबण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे दिवावासियांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे दिवा स्थानकात १२ अप आणि १२ डाऊन मार्गावरील जलद गाडय़ा रविवार सकाळपासून थांबणार आहेत. दिवा येथे गेल्या अनेक वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सीएसटी येथून सुटणारी जलद गाडी दिवा येथे ६ वाजून ५७ मिनिटांनी थांबेल. तर, कर्जत येथून ५ वाजून ५३ मिनिटांनी सुटणारी गाडी दिवा स्थानकात सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी थांबेल. या अतिरिक्त थांब्यावर या गाडय़ा थांबणार असल्याने पुढील प्रत्येक स्थानकात या गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा २ मिनिटे उशिराने पोहचतील, असे मध्ये रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.