राज्यातील मराठी शाळांमध्ये उर्दू विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार असल्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्याने त्यास शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला. शिवसेना नेते दिवाकर रावते व एकनाथ िशदे यांनी खडसे यांचा उल्लेख ‘खडसे मियाँ’ असा करीत त्यांना देण्यासाठी हिरवी टोपी विधिमंडळात आणली. मात्र मुस्लिम समाजातील मुलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
खडसे यांनी काही दिवसांपूर्वी ऐच्छिक उर्दू विषयावर मतप्रदर्शन केले होते. त्याचा रावते व शिंदे यांनी निषेध केला आणि खडसे यांना देण्यासाठी हिरव्या रंगाची टोपी विधिमंडळात आणली. मात्र त्यावेळी खडसे त्यांच्या दालनात नव्हते व सभागृहात होते. त्यामुळे त्यांच्याकडे टोपी पाठविला आली नाही. कोणतीही मागणी नसताना आणि खडसे यांच्याकडे खाते नसताना त्यांनी उर्दूच्या निर्णयाबाबत बोलण्याचे कारणच नव्हते, असे रावते यांनी सांगितले. एखादा मुस्लिम विद्यार्थी मराठी शाळेत आल्यावर त्याला उर्दू शिकविण्यासाठी वेगळे शिक्षक नेमणे, त्यांच्यासाठी सर्व सोयी करणे, हे चुकीचे धोरण असल्याची टीका रावते यांनी केली.
मात्र खडसे आपल्या भूमिकेवर ठाम असून मुस्लिमांनी मराठी शाळेत शिकून मुख्य प्रवाहात यावे. मुस्लिम समाजाचे तरुण आयएएस, आयपीएस व्हावेत, त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन शासकीय सेवेत यावे, असे वाटत असेल, तर हाच मार्ग आहे. मुस्लिम मुलांना मदरशांमध्ये कोणते शिक्षण दिले जाते, हे नीट समजू शकत नाही आणि त्यांच्यावर धार्मिक पगडा वाढत जातो. त्यामुळे त्यांना विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी हे धोरण आखण्यात येत आहे. त्याला एमआयएमसह अनेकांनी पाठिंबा व्यक्त केला आहे, असे ते  म्हणाले.