किमतीच्या स्पर्धेमुळे ‘बॅ्रण्डेड’ फराळाचे दर स्थिर; घरगुती फराळाच्या दरांत मात्र दहा टक्क्यांची वाढ

कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या फराळापेक्षा घरगुती पद्धतीने घराघरांत तयार करून विकल्या जाणाऱ्या फराळांना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळू लागल्याने कंपन्यांनी यंदाच्या वर्षी फराळाच्या दरांत वाढ केली नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, धान्य, डाळी, साखर, तेल, तूप यांच्या किमती वाढल्याने घरगुती फराळाच्या किमतीमध्ये मात्र दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे.

कामाच्या व्यापांमुळे फराळ बनवण्यापेक्षा तो विकत आणण्याकडे हल्ली कल असल्याने घरगुती किं वा हंगामी फराळ विक्रेत्यांनाही व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये महिला मंडळ, बचत गट किंवा स्वतंत्र स्वरूपातही अनेक महिला फराळ विक्री करत आहेत. विशेष म्हणजे अन्नधान्याच्या किमतीत झालेली वाढ पाहता फराळ पदार्थाचे दर मात्र वाढलेले नाहीत. काही अपवाद वगळता अनेक मोठे व्यावसायिक गेल्या वर्षीच्याच दरात फराळ विकत आहेत. ‘सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्याने मंदीची झळ आम्हालाही बसली आहे; परंतु आमच्याकडे घाऊ क स्वरूपात माल येत असल्याने फारशी तफावत जाणवत नाही. पदार्थाचे दर वाढवले तर अनेक ग्राहक तुटलील,’ असे दादर येथील मोठय़ा फराळ व्यावसायिकांनी सांगितले. शिवाय दर वाढवले तर जे ग्राहक एक किलो पदार्थ घेत होते ते अर्धाच किलो घेतील. यात ग्राहक आणि विक्रे ते दोघांचेही नुकसान असल्याचे ते सांगतात.

गेल्या वर्षी मोठय़ा व्यावसायिकांकडे भाजणी चकली, कडबोळी, तिखट शेव, चिवडा, शंकरपाळे, चिरोटे या पदार्थाचे दर साधारण ३६० ते ३८० रुपये प्रतिकिलो तर लाडू, करंजी, अनारसे आदी पदार्थ २० ते २५ रुपये प्रतिनग या दरात विकले जात होते. परंतु ग्राहकांची परिस्थिती लक्षात घेऊन याही वर्षी तेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. म्हणूनच ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय तेल-तूप कमी असलेल्या फराळाला जोगदार मागणी असल्याचे गोडबोले उद्योग समूहाचे सचिन गोडबोले यांनी सांगितले. गेल्या वर्षी चकली, चिवडा, शंकरपाळे, शेव या पदार्थाचा दर २८० ते ३०० रुपये प्रतिकिलो असा होता. तर या वर्षी ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलोने फराळ विकत आहेत. तर लाडू, करंजी, अनारसे या पदार्थाचे दर २० रुपयांवरून २२ ते २५ रुपये करण्यात आले आहेत. पदार्थाच्या किमती पाहता प्रतिकिलो साधारण १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘दरांमध्ये सरसकट वाढ नसून काही मोजक्याच पदार्थामध्ये दरवाढ करण्यात आली आहे.

अनेक पदार्थ जुन्याच दरात विकले जात आहेत. पण गेल्या वर्षी वेलची १००० रुपये प्रति किलो होती ती आज चार ते पाच हजार रुपये प्रति किलोने विकली जात आहे. यावरून मंदीचा अंदाज बांधता येतो,’ असे हंगामी फराळ विक्रेते अनिके त आपटे सांगतात.

मुंबईतील फराळ १७६ देशांत

कामानिमित्त परदेशांत स्थायिक झालेल्या भारतीयांना दिवाळी फराळाची भेट पाठवली जाते. मुंबईतून साधारण १७६ देशांमध्ये हा फराळ जातो आहे. यासाठी विक्रेत्यांना वीस दिवस आधीपासूनच तयारीला लागावे लागते. तर ज्या देशात पाठवायचे आहे तिथल्या पावसाचा अंदाज घेऊ न फराळाची बांधाबांध करावी लागते.