डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिलांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर या तिघींनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर याच आठवडय़ात सुनावणी होण्याची शक्यता आहे. आत्महत्येनंतर आरोपी डॉ. पायल यांच्या खोलीत का परतल्या, त्यांनी तेथे काय केले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांची ही कृती निश्चित संशयास्पद आहे. पुरावे शोधून नष्ट करण्यासाठी त्या तेथे गेल्या होत्या. या तडवी कुटुंबाच्या, विशेष सरकारी वकिलांच्या युक्तिवादात तथ्य असू शकते. गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाल्या. पाच ते सहा दिवसांनी त्यांना पोलिसांनी विविध ठिकाणांवरून अटक केली. पोलीस कोठडीत त्यांनी चौकशीला सहकार्य केलेले नाही. यावरून आरोपींची वृत्ती स्पष्ट होते. जर या टप्प्यावर आरोपींना जामीन मंजूर केल्यास त्या पुरावे नष्ट करू शकतात, साक्षीदारांवर दबाव आणून शकतात. तसेच त्या फरारही होऊ शकतात. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करता येणार नाही, असे नमूद करत सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे तिघींनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.