महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) त्यांचा संप बिनशर्त मागे घेतल्यानंतरच त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करू, असा ‘निरोप’ आरोग्य सचिवांनी रविवारी सायंकाळी पाठवला. मात्र, संपकर्त्यां डॉक्टरांनी ही ‘ऑफर’ नाकारली असून संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या या संपात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आणखी काही संघटना सहभागी झाल्यामुळे विशेषत: राज्याच्या ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला आहे. तर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी संपकरी डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारून शक्य तेथे नव्याने मुलाखती घेऊन भरती करण्याची भूमिका घेतली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांचे दूत म्हणूून त्यांचे विशेष कार्याधिकारी चव्हाण तसेच अवर सचिव श्रीमती गावडे यांनी उपसचिवांसह आझाद मैदानावर संपकर्त्यां डॉक्टरांची भेट घेतली. ‘आधी संप बिनशर्त मागे घ्या, नंतर तुमच्या मागण्यांबाबत बोलू’, असा प्रधान सचिवांचा निरोप त्यांनी पोहोचवला. संप मागे घेतल्यानंतरच तुमच्या मागण्यांची फाइल मंत्रिमंडळासमोर ठेवली जाईल अशी कल्पना या अधिकाऱ्यांनी दिली. तथापि, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असे उत्तर ‘मॅग्मो’तर्फे देण्यात आले.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ तज्ज्ञ यांच्या संघटनाही शनिवारपासून या संपात सहभागी झाल्या. डॉक्टर संपावर असल्याने गेला आठवडाभर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या देखरेखीखाली होत असलेले शासकीय रुग्णालयांतील शवविच्छेदनाचे काम यामुळे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड आणि सचिव डॉ. प्रमोद रक्षमवार यांचे बेमुदत उपोषण रविवारी सहाव्या दिवशीही सुरू होते. शासनाने संपकर्त्यांना ‘मेस्मा’ लागू करून अटक करण्याचा इशारा दिला असतानाच, या संपात सहभागी झालेल्या राज्याच्या ३३ जिल्ह्य़ांतील १२ हजार डॉक्टरांनी शासनाकडे राजीनामे सोपवले आहेत.
‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा
‘मॅग्मो’ संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी सोमवारी सकाळी आठ वाजता सेवेत हजार व्हावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जे डॉक्टर सेवेत हजर होणार नाहीत त्यांच्याविरुद्ध ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करावी, असे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी दिली. आंदोलन करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता सेवेत रूजू व्हावे, असे आदेश सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. सेवेत रूजू न होणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले आहे.