२७ डिसेंबर रोजी ‘व्हायकॉम १८’वर प्रसारण

निर्भया बलात्कार खटल्यावर आधारित तयार करण्यात आलेल्या ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया’ या पुरस्कार विजेत्या लघुपटाचे २७ डिसेंबर रोजी ‘व्हायकॉम १८’ नेटवर्कवर प्रसारण करण्यात येणार आहे. २७ डिसेंबर रोजी निर्भयाच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हा लघुपट प्रसारित केला जाणार आहे.
या लघुपटाची निर्मिती मारयान डेलेओ यांनी केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विभाग बक्षी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ४५ मिनिटांच्या या लघुपटात निर्भया बलात्कार प्रकरणानंतर भारतातील पुरुषांची महिलांविषयी असलेली मानसिकता नेमकी कशी आहे, ते यात सादर करण्यात आले आहे. भारतातील पोलीस अकादमी आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हा लघुपट या अगोदर दाखविण्यात आला आहे.
समाजात बदल घडविण्यासाठी माध्यमांचा चांगला उपयोग करून घेता येतो. महिला सुरक्षितता आणि सक्षमीकरण तसेच समाजात जनजागृती करण्यासाठी ‘व्हायकॉम १८’ नेटवर्कवच्या माध्यमातून हा लघुपट दाखविण्यात येणार असल्याचे समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधांशु वत्स यांनी सांगितले. ‘व्हायकॉम १८’ने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून या लघुपटाचे प्रसारण करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असल्याचे मत दिग्दर्शक विभाग बक्षी यांनी व्यक्त केले आहे.
२७ डिसेंबर रोजी ‘व्हायकॉम १८’ नेटवर्कच्या वाहिन्यांवरून याचे प्रसारण करण्यात येणार आहे.