टाळेबंदी किंवा निर्बंधांचे हे पाऊल करोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, पण कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते हे समजून घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यापाऱ्यांना  के ले.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत करोनाविरुद्धच्या या लढ्यात सरकारसोबत असल्याची ग्वाही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली.

राज्य सरकारने लागू के लेल्या कठोर निर्बंधाला विरोध करीत राज्यभरात व्यापाऱ्यांनी सुरू के लेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आताची परिस्थिती फार विचित्र आहे. करोनाचे हे संकट दुर्दैवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची सरकारची भूमिका नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा टाळेबंदी करावी अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये रुग्णसंख्या घटली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे हे निर्बंध लागू करावे लागत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट के ले.

रस्त्यावर उतरण्याची भाषा नको

कामगार- कर्मचाऱ्यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या करोना चाचण्या करण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घ्या, असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना के ले. गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा करू नये. करोना पूर्ण जात नाही, तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.

रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही, विषाणूशी आहे. कोणी चिथवले म्हणून बळी पडू नका, असे आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला हाणला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी म्हणणे मांडले.