नववर्ष स्वागतासाठी बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्या अंधेरी येथील टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी छापा टाकून बनावट मद्य तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करत याप्रकरणी एकास अटक केली.

बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्या टोळ्या मुंबईच्या वांद्रे, खार, सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव आदी भागांत भाडय़ाने जागा घेऊन त्या ठिकाणी बनावट मद्याचा कारखाना चालवतात. हलक्या प्रतीचे विदेशी मद्य व इसेंस यांच्या मिश्रणातून हे बनावट मद्य तयार केले जाते. त्यानंतर विदेशी मद्याच्या बाटल्यांमधून या बनावट मद्याची विक्री केली जाते. अंधेरी येथील आंबेवाडी येथे ‘स्कॉच’ हे विदेशी मद्य बनावटरीत्या तयार करण्यात येत असल्याची माहिती भरारी पथकास मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी आयुक्त विजय सिंघल व संचालक डॉ. बी. जी. शेखर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकत जयकिशन जदूनाथ गुप्ता (वय २३) यास दारूबंदी गुन्ह्य़ाखाली अटक केली. परंतु, याचा मुख्य सूत्रधार करण उपाध्याय हा फरार आहे. या वेळी ‘ब्ल्यू लेबल’, ‘शिवास रिगल’, ‘डबल ब्लॅक’ इत्यादी विदेशी मद्यांच्या बाटल्यांबरोबर सुमारे ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.