ई-मेलमार्फत दहा हजार पत्रे पाठविण्याचे शरद पोंक्षे यांचे आवाहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि त्यात होणारे दुर्दैवी मृत्यू कुठे तरी थांबावेत, त्यासाठी ठोस उपाययोजना करण्यास राज्य शासनाला भाग पाडावे, याकरिता अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुढाकार घेतला आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ई-मेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किमान दहा हजार ई-मेल पाठवावेत, असे आवाहन पोंक्षे यांनी केले आहे.
या विषयासंदर्भात तन्मय पेंडसे हा गेली अनेक वर्षे काम करत आहे. मात्र प्रशासन काहीही करायला तयार नसल्याचे सांगून पोंक्षे म्हणाले, तन्मयचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊ या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करा. अशी किमान दहा हजार पत्रे माझ्या ई-मेलवर पाठवावीत. त्यानंतर ही सर्व पत्रे घेऊन मी फडणवीस यांची भेट घेऊन पुढील पंधरा दिवसांत ठोस कार्यवाही करण्याची विनंती करणार आहे. या भेटीनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही किंवा उपाययोजना झाली नाही, तर नाटय़-चित्रपटसृष्टीतील माझ्या सहकलाकारांना घेऊन आपण द्रुतगती महामार्गावर उतरण्याचे ठरविले आहे. हा मार्ग जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत महामार्गावरून एकही गाडी जाऊ दिली जाणार नाही, असा इशाराही पोंक्षे यांनी दिला आहे. ponkshesharad@gmail.com या ई-मेल आयडीवर येत्या १५ जूनपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांनी पत्रे पाठवावी. या मोहिमेशी कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. पोंक्षे यांनी या संदर्भातील ‘व्हॉट्सअॅप’ पाठविलेला संदेश विविध समूहांवर सध्या फिरत आहे.

हे सगळे आधीच व्हायला हवे होते. आणखी उशीर होऊ नये म्हणून हे कळकळीचे आवाहन. द्रुतगती महामार्गावरून एकही गाडी जाऊ दिली नाही तर कोटय़वधी रुपयांचा टोलमधून मिळणारा मलिदा बंद होईल.
– शरद पोंक्षे, अभिनेते