02 March 2021

News Flash

रजा काढून गावी, पण.. पाण्याच्या ‘पेरणी’साठी!

तरुणांना रोजगार नाही. ते भरकटत चालले आहेत. महिलांचे हाल होत आहेत.’ हे दूर व्हायला हवे

शोषखड्डे आखणीचे मार्गदर्शन करताना मालेगाव आयुक्त संगीता धायगुडे.

परीक्षा संपलेल्या असतात. सुटय़ा लागलेल्या असतात. गावोगावी यात्रा, लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला असतो.. हा काळ रजांचा. शहरांतून अनेक नोकरदार सुटी काढून गावी जातात या काळात. यंदाही तेच घडते आहे.. पण यंदा त्या रजा-प्रवाहात एक वेगळीच धारा दिसते आहे.. महिना-पंधरा दिवसांची रजा काढून अनेक शहरवासी अधिकारी, कर्मचारी यंदा आपल्या गावी जात आहेत.. पण ते कुठल्याही यात्रा-जत्रा वा लग्नकार्यासाठी नव्हे, तर श्रमदानासाठी.. पाण्याची ‘पेरणी’ करण्यासाठी..

‘पाणी फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळाचा लागलेला कलंक दूर करण्यासाठी हजारो गावे प्रयत्न करत आहेत. सुमारे पाच हजार ९०० गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी राज्यातील अनेक अधिकारीही सरसावले आहेत. मालेगाव पालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे त्यातल्याच एक. त्या सांगतात, ‘अतिशय दुष्काळी असणाऱ्या तालुक्यातला माझा जन्म. ७२च्या दुष्काळाचे ओरखडे अजून मनावर आहेत. ते दिवस येणाऱ्या नवीन पिढीला पाहायला लागू नयेत यासाठी या स्पर्धेसाठी मी काम करत आहे. काही दिवस सुटी काढून प्रत्यक्ष o्रमदान करण्यासाठी मी जात आहे.’

भारतीय पोलीस सेवेतील प्रवीण इंगवले हे आजपासून १५ दिवस श्रमदान करणार आहेत. ते सांगतात, ‘आमचे बालपण बिदालसारख्या दुष्काळी भागात सायकलला हंडे लावून चार-पाच किलोमीटरवरून पाणी आणण्यात गेले. पुढे शिक्षणासाठी, कामानिमित्ताने फिरताना खूप पाणी असलेली गावे पाहिली. असे आपल्याकडेही व्हायला हवे असे वाटत होते. त्यातूनच मी या  कामात उतरलो आहे.’

मंत्रालयातील उद्योग विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ. नामदेव भोसले यांचा गावाचा एक वेगळाच अनुभव आहे. ‘पाणी नसल्यामुळे ग्रामीण भागातील स्थिती गंभीर बनली आहे. गावामध्ये एकप्रकारचे नकारात्मक वातावरण पाहायला मिळते. तरुणांना रोजगार नाही. ते भरकटत चालले आहेत. महिलांचे हाल होत आहेत.’ हे दूर व्हायला हवे या हेतूने ते काही दिवस सुटी काढून गावाच्या जलसमृद्धीसाठीच्या लढय़ात उतरणार आहेत.

ही अर्थातच काही प्रातिनिधिक उदाहरणे.. गावाविषयी मनात खरोखरच माया असलेले असे अनेक नोकरदार आज विविध शहरांतून आपल्या गावाची वाट धरताना दिसत आहेत..

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 3:19 am

Web Title: employees going village to participate in satyamev jayate water cup by paani foundation
Next Stories
1 जातिव्यवस्था निर्मूलनासाठी तरुण पिढीने पुढे यावे!
2 निवडणुका आल्यानेच भाजपला युतीचा पुळका!
3 राष्ट्रवादीशी आघाडीबाबत महिनाभराने पुन्हा चर्चा -चव्हाण
Just Now!
X