तक्रारदारांशी संपर्क साधून झालेल्या कामाची पडताळणी करणार

‘खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा’ या योजनेअंतर्गत पालिकेच्या अ‍ॅपवर ६ नोव्हेंबपर्यंत एकूण १६७० तक्रारी आल्या असून त्यापैकी ९१ टक्के तक्रारीतील खड्डे बुजवले असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. झालेल्या कामाची खातरजमा करण्यासाठी सर्व तक्रारदारांना फोन करून त्यांच्याकडून अभिप्राय घेतले जाणार आहेत. त्याकरिता पालिकेच्या वाहतूक विभागातील चार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी स्थायी समितीला दिली.

पालिकेने मुंबईत १ नोव्हेंबरपासून ‘खड्डे दाखवा आणि ५०० रुपयाचे बक्षीस मिळवा’ अशी योजना आणली. या योजनेअंतर्गत ६ नोव्हेंबपर्यंत एकूण १६७० तक्रारी आल्या. त्यापैकी ११४८ खड्डे बुजवले असल्याचे आकडीवरून पुढे आले आहे. मात्र यापैकी अनेक खड्डे २४ तासांनंतर बुजवण्यात आल्याचे खुद्द प्रशासनानेच मान्य केले होते. त्यामुळे जे खड्डे २४ तासांनंतर बुजवले त्यांच्या तक्रारदारांना पाचशे रुपयांचे बक्षीस कधी व कसे देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हे बक्षीस अधिकाऱ्यांच्या खिशातून देणार असे प्रशासनाने स्पष्ट केलेले असले तरी अधिकारी मात्र हे पैसे देण्यास इच्छुक नाही. या गोंधळाच्या स्थितीचे पडसाद बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून तक्रारदारांना बक्षीस कधी व कसे देणार, असा सवाल केला. त्यांच्या या मुद्दय़ावर सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्थायी समितीला वरील माहिती दिली.

पालिका प्रशासनाने कबूल केल्याप्रमाणे ५०० रुपयांचे बक्षीस देण्याचे नाव घेत नसताना आता या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी चार अभियंते नेमणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तक्रारींपैकी ज्या ठिकाणचे खड्डे बुजवले तेथील काम समाधानकारक आहे हे तपासले जाणार आहे. त्याकरिता तक्रारदारांशी संवाद साधण्यासाठी वाहतूक विभागातील चार अधिकारी नेमणार असल्याची माहितीही पालिका अधिकाऱ्यांनी दिली.