केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मराठी उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या उमेदवारांच्या पारडय़ात यशाचे माप भरभरून पडावे, या हेतूने दै. लोकसत्तामध्ये येत्या सोमवारपासून ‘स्पर्धा परीक्षा गुरू’ ही लेखमालिका प्रसिद्ध होईल. यात दररोज यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे विषयवार मार्गदर्शन केले जाणार आहे. या लेखमालेत तज्ज्ञांद्वारे परीक्षांचे बदललेले स्वरूप, अभ्यासक्रम, बहुपर्यायी प्रश्नोत्तरे आणि परीक्षेत उपयोगी पडतील अशा विविध टिप्स यांचा समावेश असेल.  
 दै. लोकसत्तातर्फे गतवर्षीपासून ‘स्पर्धा परीक्षा गुरू’ ही स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनपर लेखमालिका सुरू करण्यात आली. या लेखमालिकेला युवा वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यूपीएससी, एमपीएससीच्या स्पर्धापरीक्षा देण्यासाठी सज्ज व्हायला ‘लोकसत्ता’च्या या लेखमालिकेने मदतीचा हात दिला, अशी भावना अनेक वाचकांनी दूरध्वनी, पत्रे आणि ई-मेल्सद्वारे कळवली होती. वाचकांचा उदंड प्रतिसाद आणि विषयाची उपयुक्तता ध्यानात घेत यंदाही सोमवार, ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान ‘स्पर्धा परीक्षा गुरू’ ही लेखमालिका प्रसिद्ध केली जाईल.
स्पर्धापरीक्षांची गांभीर्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांना तज्ज्ञांकरवी या परीक्षांविषयीचे अद्ययावत मार्गदर्शन उपलब्ध व्हावे आणि त्यांचे मनोबल दृढ व्हावे, या हेतूने दै. लोकसत्ताने ‘स्पर्धापरीक्षा गुरू’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. यंदाही स्पर्धापरीक्षांच्या परीक्षार्थीना ‘लोकसत्ता’च्या स्पर्धापरीक्षा गुरूचे मार्गदर्शन नक्कीच उपयोगी ठरेल, ही आशा आणि परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा.