नागपूरमधील ८५ वर्षांच्या नागरिकाने (नारायण दाभाडकर) तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी आपली खाट मोकळी केली, समाजमाध्यमावरून त्याच्या चित्रफिती सर्वदूर झाल्या. त्यांचा त्याग श्रेष्ठच आहे. मात्र दोघांना अतिदक्षता विभागात खाटा मिळाल्या असल्या तर या दोघांचे प्राण वाचले असते. या घटनेतून राज्यातील आरोग्य यंत्रणेतील फोलपणा पुढे आला, अशी टीप्पणी उच्च न्यायालायने गुरुवारी केली.

करोना रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी प्राणवायू रेमडेसिविर आणि खाटांची पुरेशी उपलब्धता असल्याचा दावा राज्य सरकार आणि पालिकेने केला. त्यावेळी न्यायालयाने नागपूर येथील भांडारकर यांच्या वृत्ताचा दाखला दिला. सरकारने योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली असतील तर ज्येष्ठ नागरिकाचे आणि त्या तरुणाचे प्राण वाचले असते. ज्येष्ठ नागरिकाला त्याग करायची गरज पडली नसती, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कु लकर्णी यांच्या खंडपीठाने सुनावले. सध्याच्या स्थितीसाठी सरकार वा पालिकांना दोघांना दोष द्यायचा नाही. परंतु हे सामाजिक अपयश आहे]  असेही न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी नियंत्रित करण्याबाबतही उपाययोजना करण्याचे सरकार आणि पालिकेला निर्देश दिले. ज्येष्ठ नागरिकांना तासनतास उन्हात रांगेत उभे राहण्यासाठी भाग पाडू नका. लसीकरणासाठी प्रत्येक वर्गाकरिता वेळा ठरवण्यात याव्यात अशी सूचनाही न्यायालयाने केली.