आरोग्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जीवनदायी योजना’ करण्याविषयी माझी भूमिका स्पष्ट आहे. मुदलात ही योजना तत्कालीन युती शासनाच्या काळात बाळासाहेब व प्रमोद महाजन यांच्या प्रेरणेतून आणि तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या पुढाकाराने झाली होती. यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विरोध करण्याचे कारणच नाही, असा आक्षेप आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. या नामकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता आपली भूमिका तत्काळ जाहीर करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे.
आघाडी सरकारने विशेष असे यात काहीच केले नव्हते. आता याही योजनेत काही महत्त्वाचे बदल आम्ही करत असल्यामुळे या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे संयुक्तिक ठरेल, अशी स्पष्ट भूमिका डॉ. दीपक सावंत यांनी ‘लोकसत्ता’कडे मांडली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते याचा विरोध करणारच कारण त्यांच्याकडे सध्या दुसरे काही काम नाही. मात्र महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा विरोध अनाकलनीय आहे. भूमिकाच जर कोणी स्पष्ट करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे. सत्तेवर येताच काँग्रेस-राष्ट्रवादीने भराभर राजीव गांधी व अन्य काँग्रेस नेत्यांची या प्रकल्पांना नावे देऊन टाकली. अशावेळी जीवनदायी योजनेत अनेक नवीन बदल करून त्याचे स्वरूप बदलल्यानंतर नव्याने नामकरण करून त्याला बाळासाहेबांचे नाव देण्यात काहीही चूक नाही, असेही डॉ. सावंत यांनी ठामपणे सांगितले.

अशी आहे योजना!
दारिद्रय़ रेषेखालील रुग्णांना मोठय़ा व खर्चिक आजारांवर उपचार मिळावेत, त्यांना उपचार न मिळल्यामुळे मरण येऊ नये या भूमिकेतून जीवनदायी योजना सेना-भाजप युती शासनाच्या काळात सुरू झाली होती. यात हृदयविकार, किडनी, मज्जासंस्था व मेंदूच्या आजारांवरील उपचारांसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जात होता. याच योजनेत थोडा बदल करून म्हणजे तामिळनाडू पॅटर्न आणून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ‘राजीव गांधी’ नाव दिले.