मुंबई : टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीवर परिणामकारक उपाय ठरणारी फास्ट टॅगची सुविधा येत्या १० सप्टेंबरपासून राज्यातील सर्व टोलनाक्यांवर उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या फास्ट टॅग योजनेत राज्य रस्ते विकास महामंडळ सहभागी झाले आहे. त्यामुळे एमएसआरडीसीच्या १६ प्रकल्पातील ४२ टोलनाक्यावर तसेच देशभरातील सर्व टोलनाक्यावर ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.

टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीमुळे देशभरातच टोलला होणारा विरोध लक्षात घेऊन केंद्र सरकारने फास्ट टॅगची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार देशातील सर्व टोलनाके आणि तेथील टोलचे दर या व्यवस्थेशी ऑनलाईन जोडण्यात आले ही सुविधा ग्राहकाच्या बँक खात्याशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे फास्ट टॅग लावलेले वाहन कोणत्याही टोलनाक्यावरून गेल्यास  आपोआप टोलची रक्कम कापली जाईल. त्यासाठी वाहन थांबवावे लागणार नाही.

या योजनेत एमएसआरडीसी सहभागी झाले असून २४ टोलनाक्यांवर ही सुविधा मिळेल. त्यानंतर येत्या काही दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलनाक्यावरही ही सुविधा असेल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.