डॉन बॉस्कोच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ओपन स्कूल (एनआयओएस) मध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीशी अश्लिल वर्तन केल्याच्या आरोपावरून अटक केलेले शाळेचे उपप्राचार्य फादर इजिडिअस फालकावू (वय ६१, रा. डॉन बॉस्को स्कूल) यांनी मुंबई, ठाणे येथे कार्यरत असताना अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात फालकवू यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
याबाबत येरवडा पोलिसांकडे चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीने तक्रार दिल्यानंतर २१ जानेवारी रोजी फालकाव यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना सुरुवातीस २५ तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली. त्यानंतर २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. ‘आरोपी फादर फालकावू हे मुंबई व ठाणे येथे कार्यरत असताना या ठिकाणीही अशाच प्रकारे गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे. त्याचबरोबर शाळेतील मुलीसोबत अशाच प्रकारचे वर्तन केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्याला अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने फालकावू यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.