संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर टेकडीवरून भूस्खलन होण्याची भीती

मुंबई : कमला नेहरू पार्क येथून येणारा बी. जी. खेर मार्ग आणि बाबुलनाथकडून केम्स कॉर्नर जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या एन. एस. मार्गादरम्यानची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मलबार हिल टेकडी धोकादायक बनल्याचा प्रकार उजेडात आला असून या टेकडीवरून भूस्खलन होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी, मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळू लागल्यामुळे टेकडीवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेला कर्मचारी तैनात करावा लागला होता.

मलबार हिल टेकडीवरील कमला नेहरू पार्क येथून केम्स कॉर्नरच्या दिशेने जाणारा बी. जी. खेर मार्ग आणि बाबुलनाथ येथून केम्स कॉर्नर जंक्शनच्या दिशेने जाणारा एन. एस. पाटकर मार्गादरम्यान भलीमोठी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मलबार हिल टेकडीवरून एन. एस. पाटकर मार्गावर भूस्खलन होऊ नये यासाठी ही संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र ५ ऑगस्ट रोजी मुंबईत पावसाचे तांडव सुरू झाले आणि या भिंतीचा काही भाग कोसळला. तसेच बी. जी. खेर मार्गावरील ७०० मीटर लांबीच्या मार्गाची वाताहत झाली. तसेच संरक्षक भिंत धोकादायक  बनल्यामुळे एन. एस.पाटकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मलबार हिल टेकडीचा हा भाग धोकादायक बनत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दोन्ही रस्त्यांची उभारणी कशी करायची असा प्रश्न पालिकेला पडला होता. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी आयआयटी, मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे. टेकडीच्या तपासणीसाठी मातीचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी या टेकडीची ड्रोनच्या साहाय्याने पाहणीही करण्यात आली. मात्र पावसामुळे टेकडी वृक्षवल्लींनी झाकली गेली आहे. त्यामुळे टेकडीची स्थिती समजू शकलेली नाही.  पालिका अधिकारी पावसाळा जाण्याची वाट पाहात आहेत. त्यानंतर युद्धपातळीवर अभ्यास करून रस्त्यांच्या बांधणीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयआयटी, मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापकांचा टेकडीबाबतचा अहवाल लवकरच सादर होईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या पालिके च्या ‘डी’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.