हवामान बदलाचे परिणाम दाखवणाऱ्या पर्यावरणातील टोकाच्या घटना व त्यासंबंधी राज्याकडून अंमलात आणायच्या उपाययोजना यासंबंधीची चर्चा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज, शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ‘लोकसत्ता’ यांच्यातर्फे जागतिक तापमानवाढीचा वेध घेणाऱ्या ‘ग्लोबल वॉर्मिग’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोन दिवसांचा लघुपट चित्रपट महोत्सवाचे आयोजन, जागतिक तापमानवाढीसंबंधी कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन तसेच पर्यावरणात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे. जागतिक हवामानबदल हा विषय आता नवा राहिलेला नाही. मात्र चर्चेतून आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. या विषयाचे सखोल माहिती व कृती यासंबंधीची माहिती देणाऱ्या ‘ग्लोबल वॉर्मिग’ या मराठी व इंग्रजीतील पुस्तकाचे प्रकाशन या चर्चासत्रादरम्यान होईल. यासोबतच पर्यावरण विषयक विविध तांत्रिक अहवालांचे प्रकाशनही यावेळी होणार आहे. पर्यावरण दक्षता मंचाच्या सहकार्याने पर्यावरण विषयक वसुंधरा लघुपट महोत्सव २०१४ चे ६ व ७ जून रोजी आयोजन करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेतील फोटोथॉन २०१४ तसेच वसुंधरा पुरस्कार २०१४ यांचे वितरणही शनिवारी होत असून हरित इमारत पुरस्काराची घोषणाही करण्यात येईल.