News Flash

जोगेश्वरीत पाणी चोरी!  सोसायटीविरोधात एफआयआर

बांदिवली हिल रोडवरील फरहाद सोसायटीने परवानगी न घेताच अनधिकृतपणे कूपनलिका खोदल्याचे निदर्शनास आले.

जोगेश्वरी येथे अनधिकृतपणे कूपनलिका खोदून जलबोगद्याला छिद्र पाडून मुंबईकरांचे पाणी पळविण्याची घटना घडली असून गेले तीन दिवस अंधेरी-जोगेश्वरी परिसरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. हा प्रकार दडविणाऱ्या प्रशासनाला नगरसेवकांनी गुरुवारी पालिका सभागृहात खडसावले. अनधिकृतपणे कूपनलिका खोदणाऱ्या संबंधित सोसायटीविरुद्ध एफआयआर दाखल करावा आणि जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्चही वसूल करावा, असे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला दिले.

अंधेरी (प.) आणि जोगेश्वरी (प.) परिसराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून पालिकेने वेरावली जलाशय-आदर्शनगर- यारी रोडदरम्यान जलबोगदा उभारण्यात आला आहे. या भागात जलवाहिनी फुटल्याची तक्रार वारंवार नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे जल विभागाने तपास केल्यानंतर जोगेश्वरी (प.) येथील बांदिवली हिल रोडवरील फरहाद सोसायटीने परवानगी न घेताच अनधिकृतपणे कूपनलिका खोदल्याचे निदर्शनास आले. कूपनलिकेमुळे उपलब्ध झालेल्या पाण्याची चाचणी केली असता त्यात क्लोरिन आढळून आले. शोध घेतल्यानंतर या कूपनलिकेमुळे जलबोगद्याला छिद्र पडल्याचे आढळून आले. त्यामुळे या सोसायटीविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून छिद्र बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी गुरुवारी पालिका सभागृहात दिली. स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत पाण्याचा आढावा सादर करताना प्रशासनाने ही माहिती का दडवून ठेवली? त्यामुळे गेले तीन दिवस अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. नागरिक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. नागरिकांचे हाल करणाऱ्या सोसायटीची चौकशी करा, तसेच छिद्र बुजविण्यासाठी येणारा खर्च त्याच सोसायटीकडून वसूल करावा, अशी मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली.

केवळ एफआयआर करून चालणार नाही, तर प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी करावी. तसेच दुरुस्तीचा खर्चही सोसायटीकडून वसूल करावा, असे आदेश स्नेहल आंबेकर यांनी या वेळी दिले.

’अंधेरी (प.) आणि जोगेश्वरी (प.) परिसराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून पालिकेने वेरावली जलाशय-आदर्शनगर- यारी रोडदरम्यान जलबोगदा उभारण्यात आला आहे.

’या भागात जलवाहिनी फुटल्याची तक्रार वारंवार नागरिकांकडून करण्यात येत होती.

’जल विभागाने तपास केल्यानंतर जोगेश्वरी (प.) येथील बांदिवली हिल रोडवरील फरहाद सोसायटीने परवानगी न घेताच अनधिकृतपणे कूपनलिका खोदल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2015 12:11 am

Web Title: fir against housing society for puncturing water tunnel
टॅग : Housing Society
Next Stories
1 वैद्यकीय संशोधनासाठी अवघ्या १५ लाखांची तरतूद!
2 परीक्षा महत्त्वाची की निवडणुकीची कामे?
3 शाळांमध्ये १५ ऑक्टोबरला वाचनाचा ‘आनंदोत्सव’
Just Now!
X