वीजचोरीच्या घटना उघडकीला आणून त्यांची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना देणाऱ्या माहीतगाराला बक्षिसाची रक्कम न देणाऱ्या महावितरणच्या दक्षता अधिकारी युनुस मिर्झासह दोघांविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तीन जणांनी बक्षिसाची २ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम परस्पर गिळंकृत केल्याचा आरोप पुणे, कोथरूड येथे राहणाऱ्या एका ५४ वर्षांच्या व्यक्तीने तक्रारीत केला आहे. सप्टेंबर २०११ ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीत वीजचोरीची सात प्रकरणे फिर्यादीने तेजश्री कार्यालयात नोंदविली होती. या वीजचोऱ्या दक्षता पथकाने पकडल्या. फिर्यादीला बक्षिसाची रक्कम देण्याची शिफारस करण्यात आली. महावितरणचे फिरत्या पथकाचे साहाय्यक दक्षता अधिकारी, कल्याणमधील रहिवासी राजेश व दीपक यांनी कट करून, बनावट पावत्या व पत्त्यांचा अवलंब करून आपली बक्षिसाची रक्कम हडप केली असल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत़