बॅलार्ड पिअर येथे सरकारी इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली. आगीत जीवितहानी झाली नसली तरी अंमली पदार्थविरोधी शाखेच्या कार्यालयातील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आग विझविसाठी तीन तास लागले.
दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथे ‘एक्स्चेंज’ या तीन मजली शासकीय इमारतीला सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या इमारतीत पंधराहून अधिक शासकीय कार्यालये आहेत. सुरुवातीला आगीचे स्वरूप किरकोळ होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून इमारत रिकामी केली. आग तिसऱ्या मजल्यावर लागली होती. दहा अग्निशमन गाडय़ांच्या सहाय्याने तीन तासांत आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र तिसऱ्या मजल्यावरील अंमली पदार्थ विरोधी शाखेचे कार्यालय जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महत्त्वाची इमारत असूनही आग विझविण्यास एवढा वेळ लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.