वसरेवा-अंधेरी- घाटकोपर या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या आणि वर्षांनुवर्षे रखडलेल्या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणी अखेर बुधवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी होत आहे. मेट्रो रेल्वेचा मार्ग घाटकोपपर्यंत असला तरी पहिल्या टप्प्यात वसरेवा ते आझाद नगर मेट्रो रेल्वे स्थानक या तीन किलोमीटरच्या मार्गावर ही चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या चाचणीला हिरवा झेंडा दाखवतील.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेचे बांधकाम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. ११.४० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मेट्रो रेल्वे ही या वर्षी सुरू होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केले होते. मे २०१३ पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन चाचण्या सुरू होतील व नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये मेट्रो रेल्वे सुरू होईल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. ही पहिली मेट्रो रेल्वे ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या अखत्यारीतील ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ या कंपनीतर्फे उभारण्यात येत आहे.
त्यानुसार बुधवार, १ मे रोजी या रखडलेल्या मेट्रो रेल्वेची औपचारिक चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणी वेळी मेट्रो रेल्वे वसरेवा येथील मेट्रोच्या कारडेपोमधून निघेल आणि डीएन नगर मेट्रो रेल्वेस्थानक ओलांडत आझाद नगर स्थानकापर्यंत प्रवास करेल. वसरेवा ते घाटकोपर या मार्गावर १२ स्थानके असली व तांत्रिकदृष्टय़ा पहिला टप्पा अंधेरीपर्यंतचा असला तरी चाचणी वेळी ती केवळ आझाद नगपर्यंतच धावेल. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यूपीएस मदान आणि इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित असतील.
वसरेवा ते घाटकोपर हे अंतर मेट्रो रेल्वेमुळे अवघ्या २१ मिनिटांत आणि तेही वातानुकूलित डब्यांमधून कापता येईल. या प्रवासासाठी सध्या रस्ता पूर्ण मोकळा असला तरी सुमारे पाऊण तास लागतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 5:18 am