27 September 2020

News Flash

बाजारगप्पा : आद्य मासळीबाजार

रात्री समुद्राची मोहीम फत्ते करून हजारो लहान-मोठय़ा बोटी ससून डॉकच्या किनाऱ्याला लागलेल्या असतात.

विस्तीर्ण समुद्रकिनारे, ब्रिटिशकालीन इमारती, बॉलीवूड आदींबरोबरच येथील बाजारपेठांमुळेही ‘मुंबई’ इतर शहरांच्या तुलनेत वेगळी वाटते. क्रॉफर्ड, मंगलदास, भेंडी बाजार यांच्याबरोबरच मुंबईत चोर आणि शेअरचा बाजारही भरतो. अशा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील आगळ्यावेगळ्या बाजारपेठांची ओळख करून देणारे हे पाक्षिक सदर ‘बाजारगप्पा’ आजपासून वाचकांच्या भेटीला.

रात्री समुद्राची मोहीम फत्ते करून हजारो लहान-मोठय़ा बोटी ससून डॉकच्या किनाऱ्याला लागलेल्या असतात. तर डॉकच्या दुसऱ्या बाजूला बोटींतून आलेल्या टनावारी माशांना मुंबई आणि उपनगरातील कानाकोपऱ्यात विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता आलेल्या वाहनांची गर्दी. या दोहोंच्यामध्ये पहाटे चार वाजल्यापासून जो कोलाहल भरून राहिलेला असतो तो म्हणजे मुंबईचा आद्य मासळीबाजार.

ससून डॉक.. मुंबईच्या आद्य बाजारपेठांपैकी एक. गोंधळी वातावरणाला ‘मासळी बाजार’ असे का म्हणतात, याचा उलगडा या बाजारात पाऊल ठेवताक्षणी होतो. इतक्या कोलाहलात इथल्या कोळणी आणि व्यापारी एकमेकांशी व्यवहार कसा करतात, असा प्रश्न पडतो. हा कलकलाट मध्यरात्रीपासूनच सुरू होतो. पहाटे सूर्य उगवतीला येत असताना तो टिपेला पोहोचतो. या कोलाहलाबरोबरच तऱ्हेतऱ्हेच्या मासळीचा वास नाकासोबत तुमच्या देहातही जणू भरून राहतो.

ससून डॉकमध्ये दाखल होण्याच्या आधीपासूनच दूरवर येथील मासळी बाजाराची साक्ष देणारा गंध वाऱ्यासोबत पसरलेला असतो. डॉकच्या दिशेने जाणाऱ्या शहीद भगतसिंग मार्गावर गर्दीतून कशीबशी वाट काढत बाजार गाठावा लागतो. या गर्दीत डोक्यावर टोपल्या घेऊन लगबगीने निघालेल्या कोळीणी, मुंबई-ठाण्याच्या परिसरातील किरकोळ मासळी विक्रेते, हॉटेलांचे पुरवठादार आणि सर्वसामान्य ग्राहक असे सारेच जण असतात. यातील प्रत्येकाला जणू ससून डॉकवरून येणारा गंध आपल्याकडे खेचत असतो. थोडं अंतर पुढे गेल्यावर ससून डॉकची पांढऱ्या आणि गेरूच्या रंगाची उलटय़ा इंग्रजी आद्याक्षर ‘टी’च्या आकाराची इमारत दृष्टीस पडते. इमारतीच्या वरच्या टोकाला ‘जॉन बॅनेट, लंडन’ लिहिलेले घडय़ाळ. ब्रिटिशकालीन इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर भगवा फडफडत असतो. आत गेल्यावर साधारण ५००हून अधिक टेम्पो, ट्रक, चारचाकी, हातगाडी अशी वाहने माशांना घेऊन जाण्याच्या तयारीत असतात. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर दोन रस्ते. पण माशांच्या वासाचा मागोवा घेत अंदाजाने डावा रस्ता निवडला तर समोरच मुंबईचा आद्य मासळी बाजार भरलेला.

खरे तर या मासळी बाजारात इतरही अनेक बाजार भरतात. उजव्या बाजूला मासे टिकविण्यासाठी लागणाऱ्या बर्फाचे दोन कारखाने होते. परंतु यातला एक कारखाना सध्या बंद आहे. समोरच गेली अनेक वष्रे बंद असलेली मुकेश मिल. ही मिल इथे कशी हे शोधायचे तर थोडे इतिहासात डोकावावे लागेल. १८७१ साली अल्बर्ट अब्दुल डेव्हिड ससून या बगदादी ज्यू नेत्याने सागरी व्यापारासाठी दक्षिण मुंबईच्या किनाऱ्यावर या डॉकची बांधणी केली. त्या वेळी इंग्लंड व युरोपातून कापूस येत असे. व्यावसायिक कारणासाठी उभारण्यात आलेला हा पश्चिम भारतातील पहिला डॉक. परंतु आता मासळी बाजार झालेला.

ताज्या मासळीबरोबरच सुके मासे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फळे यांशिवाय कोळणींना आवडतील असे छोटे-मोठे दागिने या ठिकाणी विक्रीकरिता मांडून ठेवलेले दिसतात. थोडे पुढे गेले की कोळंबी, बोंबिलचे डोंगर रचलेले दिसतात. ‘बोला दोनशे-दोनशे’ आरोळी ठोकणारा लिलाव सुरू असतो. ५ ते १० टक्के कमिनशवर दलालांचे पोट चालते. ‘पाचशे पाचशे’ ओरडत असताना मध्येच एखादी कोळीण पाचशे पन्नास म्हणते आणि तो माशांचा ढीग तिचा होतो. मग त्यात बर्फ भरून पटापट हा माल उचलत गाडीत भरला जातो. लवकर विक्री व्हावी यासाठी कोळणी जिवाचे रान करतात. त्यामुळे या बाजारात कुणालाच उसंत नसते. बोटींतून आलेले ताजे मासे आपल्या टोपलीत झटपट पडावे, यासाठी प्रत्येकीचा आटापीटा चाललेला असतो. काही कंपन्याही येथून मासे खरेदी करतात. या कंपन्या मासे साधारणपणे उणे २० अंश सेल्सिअस तापमानात गोठवून आकर्षक वेष्टनात गुंडाळून परदेशात पाठवितात. कोळणींशी छत्तीसचा आकडा असलेले उत्तर भारतीय विक्रेतेही येथूनच खरेदी करतात. या बाजारातली मनात घर करून राहणारी एक गोष्ट म्हणजे इथल्या कोळणींचा सहज वावर. इथल्या व्यापाऱ्यांशी वर्षोनुवष्रे ओळख असल्याप्रमाणे गप्पा मारण्याचे त्यांचे कसब काही औरच. या घडामोडी नवख्या माणसाला गोंधळ वाटू शकतील, मात्र त्यालाही एक शिस्त असते. मोठमोठय़ा आवाजातील बोलणी, टोपल्या टाकण्या-भरण्याचे आवाज, ट्रकचा गर्रगर्राट हे सगळं या बाजाराशी इतकं एकरूप झालेलं आहे की, ते कधी नसेल तर, हा बाजारच नसेल, हे पटतं.

बोटीतून बाजारात..

मासेमारीकरिता जाणाऱ्या बोटींमध्ये साधारण १० ते १२ कप्पे असतात. मासे साठविण्यासाठी बोटींमध्ये असे कप्पे खास तयार करवून घेतले जातात. यात उतरून मच्छीमार मासे बाहेर काढतात. मासे बोटीबाहेर आणण्याच्याही दोन पद्धती आहेत. एकीत जाळीच्या साहाय्याने माशांचे बांधलेले गाठोडे दोरीच्या मदतीने पाण्यात टाकले जाते. दोरीचे दुसरे टोक किनाऱ्यावरील व्यक्तींकडे असते. हे लोक मग दोरीच्या साहाय्याने हे गाठोडे पाण्यातून ओढून घेतात. दुसरीत थेट घमेल्याच्या साहाय्याने मासे बोटीतून बाहेर आणले जातात. याला जास्त वेळ लागतो.

रोजगार कधी तरी ‘गार’

ट्रॉलर, ड्रोल, दाल्दी, बुडी, खांदे, पर्ससीन आणि पारंपरिक इंजिनरहित बोटी आदींच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. एका मोठय़ा बोटीवर साधारणपणे १२ ते १४ व्यक्ती काम करतात. कोळंबी, पापलेट हे खवय्यांच्या पसंतीला उतरणारे मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात जावे लागते. कारण माशांच्या जवळपास ४८० प्रजाती असल्या तरी त्यापैकी खवय्यांच्या पसंतीला उतरणाऱ्या अवघ्या ३० ते ४० आहेत. त्यातही कुठल्या दिवशी कोणता मासा जाळ्यात गावेल हे काहीच निश्चित नसते. त्यामुळे मच्छीमार दोन-तीन दिवस समुद्रावरच असतात. दोन-तीन दिवसांचा रोजगार किंवा माशांच्या बोलीवर कामगार बोटीवर काम करतात.

कोळंबीपासून कुटापर्यंत..

बाजारात तऱ्हेतऱ्हेचे मासे पाहायला मिळतात. कोळंबी, पापलेट, सुरमई, रावस, बांगडा, मोशी, तिसऱ्या, हलवा, माकूळ यांच्याबरोबरच चप्पल, घोळ, तांब, बळे, नळ, शेवंड, हेकरू, करली, ढोमी, कुपा, मोडका असे अनेक प्रकारचे मासे या बाजारात उपलब्ध होतात. यातल्या सडलेल्या किंवा निरुपयोगी माशांना ‘कुटा’ म्हणतात. पण बाजारात या कुटालाही किंमत आहे. हे मासे काही छोटे व्यापारी घेत असतात. हा कुटा सुकवून याचा भुगा करून कोंबडय़ांना खाद्य म्हणून दिला जातो.

वर्षांकाठी ५५० कोटींची उलाढाल

राज्यातील मासळी बाजारात २०१२ साली वर्षांला २४,००० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यापैकी फक्त ससून डॉकमधली उलाढाल ही सुमारे ५५० कोटी रुपयांची होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2017 2:33 am

Web Title: fish market of mumbai
Next Stories
1 दळण आणि ‘वळण’ : रेल्वेतील ‘संस्थानिक’!
2 तपासचक्र : तिहेरी खुनाचा उलगडा
3 सेलिब्रिटी ते झोपडपट्टी..
Just Now!
X