शीव उड्डाणपूल दुरुस्तीसाठी आजपासून बंद

मुंबई : शीव उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकामास आज, शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून सुरुवात होणार असून १७ फेब्रुवारीपर्यंत पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. त्यानंतर बेअिरग बदलण्यासाठी पुढील आठ आठवडय़ांतील प्रत्येकी चार दिवस हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीवर ताण  पडण्याची भीती आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून प्रस्तावित होते. मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला असून, पहाटे ५ वाजल्यापासून काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल वाहतुकीस बंद राहील.

बेअरिंग बदलण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केले जात आहे. यासाठी ६ एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवडय़ात शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत चार दिवस उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील, असे महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.