मिरारोड येथील साईबाबानगर परिसरात राहणाऱ्या चार वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या चौकडीस ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या चौकडीने त्या मुलाला पश्चिम बंगालमध्ये नेले होते. तेथून पोलिसांनी या मुलाची सुखरूप सुटका केली आहे. विशेष म्हणजे, अपहृत मुलाची आई आणि आरोपी महिला मैत्रिणी असून त्यांच्यात वेषभूषेवरून वाद झाला होता. त्यामुळे तिला धडा शिकविण्यासाठी तसेच २५ लाख रुपये कमविण्याच्या उद्देशातून त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
पिंकी तुलसी गुप्ता, तिची बहिण किरण गुप्ता, आई रिनीदेवी राधे गुप्ता आणि टिंकू साव, अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. मिरारोड येथील साईबाबानगर भागात राहणाऱ्या रुबी विद्यारतन वर्मा यांच्या आयुष या चार वर्षीय मुलाचे आठ दिवसांपुर्वी अपहरण झाले होते. रुबी आणि पिंकी या दोघी मैत्रिणी असून २४ जानेवारीला पिंकी तिच्या घरी गेली होती. त्यावेळी पिंकीच्या मुलीसोबत दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या आयुषचे अपहरण झाले होते. तसेच आयुषच्या सुटकेसाठी पीसीओवरून २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि मिरारोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांच्या पथकाने तपास करून या गुन्ह्य़ाचा छडा लावला.

राज्यपालांना परत बोलाविण्यासाठी राष्ट्रपतींना भेटणार-रविशंकर प्रसाद
मुंबई:‘आदर्श’ गैरव्यवहारप्रकरणी चौकशी आयोगाने दोषी ठरवूनही त्यांच्याविरुद्धच्या फौजदारी खटल्यास परवानगी नाकारण्याचा निर्णय दिल्याने राज्यपाल के. शंकरनारायणन् यांना परत बोलाविण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. काँग्रेसचे नेत्यांना संरक्षण देण्याचे त्यांचे धोरण आहे. राहुल गांधी यांनी फेरविचार करण्याची सूचना करूनही चव्हाण यांना वाचविण्यात आले. राज्यपालांवर कोणी दबाव आणला, असा सवाल प्रसाद यांनी केला.