मालाडमध्ये दहावीत शिकणाऱ्या चार मुलांनी त्यांच्या वर्गमैत्रिणीवर सामूहिक बलात्कार करून त्याची क्लीप व्हॉट्सअॅपवर प्रसारित केल्याची खळबळजनक घटना मुंबईत उघडकीस आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी सुधारगृहात केली. व्हॉट्सअॅपवरील क्लीप पीडित मुलीच्या नातेवाईकांना दिसल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासात मदत हवी म्हणून आरोपींपैकी एकाने पीडित मुलीला ८ नोव्हेंबरला आपल्या घरी बोलावले. हा मुलगा आणि मुलगी एकाच सोसायटीमध्ये राहतात. ही मुलगी घरी पोहोचली त्यावेळी तिथे अन्य तीन विद्यार्थीही उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि त्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले. यानंतर सर्वांनी त्या मुलीला घरच्यांना कोणतीही माहिती देऊ नये, अशी धमकी दिली. पीडित मुलगी मुंबईमध्ये तिच्या नातेवाईकांकडे राहाते. घाबरल्यामुळे तिने याबद्दल नातेवाईकांना काही सांगितले नाही. घटनेनंतर काही दिवसांनी आरोपींपैकी एकाने मोबाईलमध्ये केलेले रेकॉर्डिंग व्हॉट्सअॅपवर शेअर केले. त्यानंतर ही क्लीप वेगाने प्रसारित होऊ लागली. तीच क्लीप पुढे मुलीच्या नातेवाईंकांच्या मोबाईलवर आली. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. ही घटना समजल्यावर संबंधित नातेवाईकांनी पोलिसाकडे तक्रार केली. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.