शक्ती मिल कंपाऊंडमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे व्रण ताजे असताना गोरेगावात परिचित युवकांनी एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. धनत्रयोदशीच्या रात्री या तरुणीला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दोन तरुणांनी बोलावून घेतले. त्यानंतर या दोघांसह आणखी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरुणीने रविवारी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चारही आरोपी फरारी आहेत.
गोरेगाव पूर्व येथील ही तरुणी शुक्रवारी दोन मित्रांकडे गेली होती. तेथे त्यांचे आणखी दोन मित्र आले होते. ही तरुणी घरात शिरल्यानंतर त्यांनी तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तोकडा पडला. अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास तिची सुटका झाली. त्या रात्री तरुणीने आपल्या आईवडिलांना काहीच सांगितले नाही. मात्र अखेर तिने भीत भीत आपल्या आईवडिलांना घडला प्रकार सांगितला. हा प्रकार कानावर पडताच हबकलेल्या पालकांनी तातडीने दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.