चिंचपोकळीतून ८८ सिलिंडर जप्त; फेरीवाले, हॉटेलना अनधिकृत पुरवठा
हॉटेल, फेरीवाले आदींना दामदुप्पट पैसे घेऊन चिंचपोकळीजवळील एका झोपडपट्टीतून अनधिकृतपणे गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून या झोपडपट्टीतून तब्बल ८८ गॅस सिलिंडर पालिकेने जप्त केले. यापैकी निम्मे गॅस सिलिंडर रिकामी होते. तसेच नऊ गॅस सिलिंडर गोणींमध्ये भरून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
कमला मिलमधील ‘मोजो बिस्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या रेस्टोपबना लागलेल्या आगीत काही जणांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिकेने मुंबईमधील हॉटेल, मॉलच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. तसेच आस्थापनांमधील अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्याची जबाबदारी अग्निसुरक्षा पालन कक्षावर सोपविण्यात आली आहे. पालिकेच्या ‘जी-दक्षिण’ विभाग कार्यालयातील अग्निसुक्षा पालन कक्षातील अधिकाऱ्यांनी चिंचपोकळी येथील ना. म. जोशी मार्गावरील झोपडपट्टीमध्ये केलेल्या पाहणीदरम्यान एका झोपडीत नऊ गॅस सिलिंडर गोणींमध्ये भरून ठेवल्याचे आढळून आले होते. हे सिलिंडर जप्त केल्यानंतर अग्निसुरक्षा पालन कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या झोपडपट्टीतील झोपडय़ांची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान एका खोलीमध्ये ७९ गॅस सिलिंडर ठेवल्याचे निदर्शनास आले. अनधिकृतपणे साठा केलेले हे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. एप्रिलमध्ये ‘जी-दक्षिण’ विभाग कार्यालयातील पथकाने केलेल्या तपासणीमध्ये तब्बल ४०७ अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आल्याची माहिती ‘जी-दक्षिण’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दिली. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार असून जप्त केलेले सिलिंडर देवनार येथील गोदामात पाठवण्यात आले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 1:39 am