मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य विभागास सूचना

मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, प्राधान्याने पूर्ण करा. त्यानंतरच नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करा. तसेच दुर्गम भागातील आरोग्य सुविधांसाठी उद्योजक, संस्थांची मदत घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आरोग्य विभागास दिल्या.

राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन या लाटेचा मुकाबला करण्यासाठीची राज्याची तयारी आणि करावयाच्या उपाययोजना याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

उद्योजक, स्वयंसेवी संस्थापुढे आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणी संदर्भातील सादरीकरण करून ते कोणती जबाबदारी घेऊ शकतात हे त्यांना विचारावे. मेळघाट, जव्हार, मोखाडा यासारख्या आदिवासी भागातील आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातील आरोग्य सेवा-सुविधा तसेच प्राणवायू उत्पादन निर्मिती व साठवणूक क्षमता यांची त्यांनी माहिती घेतली.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातील कुठल्या सुविधा भविष्यात कायम स्वरुपी ठेवता येतील व कोणत्या सेवांचे श्रेणीवर्धन करता येईल, याचा आराखडा तयार करावा. आरोग्य संस्थांची जी बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात त्याची कालबद्धता आणि जबाबदारी निश्चित करावी, तसेच आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांच्या निर्माण व दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात यावा, अशा सूचनाही ठाकरे यांनी आरोग्य विभागास दिल्या.