घोडबंदर म्हणजे नवठाणे! ठाणे शहरात असला तरी या परिसराने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठमोठे कॉम्प्लेक्स, आकर्षक गृहसंकुले, मॉल आदींमुळे या परिसराने ठाणे शहराचे रूपडेच पालटून टाकले. ‘हाय सोसायटी’ म्हणून ओळख असलेला हा परिसर निसर्गसमृद्धीने नटलेला आहे. एका बाजूला उल्हास नदी आणि पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा निसर्गरम्य परिसर. याच परिसरात घोडबंदर किल्ला असून या किल्ल्यामुळे या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते.

ठाणे बस स्थानकातून बसने घोडबंदर गावात आले की तेथून एक डोंगरवाट घोडबंदर किल्ल्याकडे जाते. सध्या भग्नावस्थेत असला तरी या किल्ल्याने पोर्तुगीज व मराठा साम्राज्याच्या स्मृती जपल्या आहेत. गावातील डोंगरवाट चढून वर गेले तर या किल्ल्याचे भग्न प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून आत आले की पुढे एक पुरातन इमारत असून, त्यात दोन दालने आहेत. पुढे एक उंच भिंतीचे सभागृह असून, तो दरबार असावा, अशी शक्यता आहे. या किल्ल्यातील अजून एक वैशिष्टय़ म्हणजे या किल्ल्यावर असलेला बुरूज. या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बुरुजाला एक दरवाजा असून, त्याला कोणताही कडी-कोयंडा नसल्याचे दिसते. दरवाजा उघडण्याची किंवा बंद करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचेतून तो खाली-वर करून बंद करता येतो. अशा अभिनव पद्धतीची रचना या दरवाजाची आहे.

या बुरुजावरून समोरचे निसर्गरम्य दृश्य खूपच अप्रतिम दिसते. उल्हास नदीचे पात्र आणि खाडी यांचे विलोभनीय दृश्य मन मोहून टाकते. गार वारा अंगावर घेत या बुरुजावर काही वेळ घालविला तरी मन प्रसन्न होते. किल्ल्याभोवती दगडी तटबंदी आहे.

या परिसराला घोडबंदर हे नाव का पडले याची माहितीही खूप अप्रतिम आहे. उल्हास नदीच्या खाडीच्या दोन बाजूंना डोंगराच्या दोन सोंडा खाली उतरल्या आहेत, त्यांपैकी एक सोंड घोडय़ासारखी दिसते, म्हणून त्याला घोडबंदर असे म्हणतात, अशी माहिती आहे. हा किल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. सध्या भग्नावस्थेत असलेल्या या किल्ल्याची डागडुजी करण्याची गरज आहे.

कसे जाल?

  • ठाणे स्थानकातून बोरिवली, भाईंदर, मीरा रोड किंवा घोडबंदर येथे जाणाऱ्या बस आहेत. घोडबंदर गावात उतरले की चालत किल्ल्यावर जावे लागते.
  • ठाणे स्थानकाबाहेरून घोडबंदरला जाण्यासाठी रिक्षाही उपलब्ध आहेत.
  • घोडबंदर गावातून किल्ल्यावर जायला ४० ते ४५ मिनिटे लागतात.

इतिहास

या किल्ल्याला पोर्तुगीज साम्राज्याचा इतिहास आहे. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही १६७२मध्ये या किल्ल्याला धडक दिली होती, मात्र त्यांना तो जिंकता आला नाही. पुढे १७३७मध्ये चिमाजी अप्पाने वसईला वेढा दिला, त्या वेळी या किल्ल्यावर धडक देऊन येथे आपले निशाण फडकाविले होते. १८१८मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा प्रशासन मुख्यालय सुरू केले.