गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक संकटांचा सामना करीत वर्षपूर्ती केली आहे. पण आता आजपासून महाराष्ट्रासाठी मंगल दिवस सुरु होतील, असा विश्वास आणि शुभेच्छा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

राउत म्हणाले, “हे सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधीपक्षांनी अघोरी प्रयत्न केले. पण या सर्वांना पुरुन उरून या सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पण मला वाटतं की  दिवाळीनंतर आजपासून महाराष्ट्रासाठी आणि मंगल आणि शुभ दिवस सुरु होतील. पुढील चार वर्षे महाराष्ट्राचा विकास, जनतेच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राला मजबूत करण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलेलं, असं मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेतून मला जाणवलं. सर्वांनी मागची संकटं विसरुन पुढील चार वर्षे आपण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काम करावं.”

“विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याची प्रयत्न केली पण सरकारला थोडंही खरचटलं नाही, त्यामुळे विरोधकांनी ही भाषा बंद केली पाहिजे. तसेच महाराष्ट्रासाठी कल्याणासाठी सरकारला सहकार्य करावं. बाकी निवडणुकीच्या निकालांबाबत आम्ही काय करायचं ते पाहू. महाराष्ट्रातलं सरकार पुढील पाच वर्षे स्थिरचं राहिल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राहतील,” असंही राऊत यावेळी म्हणाले.

किती काळ सीमेवर जवान शहीद होत राहणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करतात ही चांगली बाब आहे. पण मोदींनी हे विसरु नये की नुकतेच पाकिस्तानच्या गोळीबारात आपले जवान शहीद झाले आहेत यात महाराष्ट्राच्या दोन जवानांचा समावेश होता. अजून किती काळ सीमेवर जवान शहीद होत राहणार? असा सवालही राऊत यांनी पतंप्रधानांना केला.