3डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा जन्मदिवस म्हणजे १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजर करण्यात येणार आहे. यासाठी शाळा शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच जोडीला आता ऑनलाइन विश्वकोश ही बिरुदावली मिरवणारा विकिपीडियाही या उपक्रमात सहभागी झाली आहे. या संकेतस्थळाच्या मराठी विभागाने केवळ एकच दिवस नव्हे तर पूर्ण एक आठवडा वाचनासाठी देण्याचे ठरविले आहे. यामुळे सतत ऑनलाइन वारवरणारी तरुणाई यानिमित्ताने वाचनाकडे वळू शकेल.
कोणताही संदर्भ पाहायचा झाला की आपण तातडीने विकिपीडियावर जातो आणि तेथे आपल्याला खात्रीलायक माहिती मिळणार अशी आपल्याला शाश्वती मिळते. यामुळे विकिपीडियावरचे वाचन अधिक समृद्ध करण्यासाठी मराठी विकिपीडियाने पुढाकार घेतला असून त्यांनी ‘वाचन प्रेरणा सप्ताहा’चे आयोजन केले आहे. या सप्ताहानिमित्त विकिपीडियावरील साहित्य कसे शोधावे, माहिती मिळवण्यासाठी विकिपीडियाचा वापर कशा पद्धतीने करावा, एखाद्य विषयाशी निगडित साहित्य कुठे पाहावे, संदर्भ कसे पाहावे याच्या क्लृप्त्या सांगणारे लेख मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय मराठी विकिपीडियाच्या मुख्य पानावर विविध प्रकारच्या साहित्याचे आणि पुस्तकांचे विभाग करून देण्यात आले आहेत. यामुळे आपल्याला या संकेतस्थळावरील माहिती मिळवणे सोपे जाणार आहे. मराठी विकिपीडियावर सध्या ४२ हजार ५३३ लेख, विविध विषयांची माहिती असेलेली एक लाख ७२ हजार ६०७ पाने आहेत तर २० हजार ४३८ छायाचित्रे उपलब्ध आहेत. ऑनलाइन विश्वकोश हा केवळ निवडक लोकांनीच वाचावा असा समज आहे. पण हा समज मोडीत काढून सामान्यांनी या साहित्याचा वापर करून त्यांचे ज्ञान वाढवावे असा प्रयत्न असल्याचे मराठी विकिपीडियाचे प्र-चालक प्रा. राहुल देशमुख यांनी स्पष्ट केले.