पश्चिम-पूर्व उपनगराच्या जोडणीचा मार्ग मोकळा;  बोरिवली, गोराई, घोडबंदर येथे जेट्टी उभारणार

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जलवाहतुकीने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बोरिवली, गोराई आणि घोडबंदर अशी फेरी जेट्टी उभारण्यास महाराष्ट्र मेरिटाइम मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी हिरवा कंदील दाखवला. या प्रकल्पासाठी कांदळवनांची कत्तल करावी लागणार असल्याने मंडळाने उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

बोरिवली आणि गोराई ते घोडबंदर ही प्रवासी फेरी जेट्टी तसेच मनोरी येथे ‘रोल-ऑन’ आणि ‘रोल-ऑफ’ जेट्टी अशा तीन प्रकल्पांना मंजुरी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासह शहरांतर्गत जलवाहतुकीलाही चालना मिळेल, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र, या तिन्ही प्रकल्पांसाठी कांदळवनाशेजारील आरक्षित जागेचा वापर करावा लागणार आहे. जनहितार्थ प्रकल्पांसाठी कांदळवनांची कत्तल करायची असल्यास, न्यायालयाची परवानगी घेतली पाहिजे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र मेरिटाइम मंडळाने ही याचिका केल्याचे मंडळाच्या वतीने अ‍ॅड्. साकेत मोने यांनी न्यायालयाला सांगितले.

महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) या प्रकल्पांना परवानगी दिलेली आहे. तिन्ही प्रकल्पांमुळे कांदळवनांची कत्तल केली जाणार नसली तरी, कांदळवनाशेजारील आरक्षित जागेवर या तिन्ही जेट्टी उभारण्यात येणार आहेत. त्यामुळेच न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार परवानगीसाठी याचिका करण्यात आल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. हा प्रकल्प जनहितार्थ आणि पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्थेचा विचार करूनच आखण्यात आल्याचा दावाही मंडळाने केला.

यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मंडळाचे तिन्ही प्रस्तावित प्रकल्प हे जनहितार्थ असून त्यामुळे पश्चिम व पूर्व उपनगरे जोडली जातील, असे नमूद करत मंडळाची मागणी मान्य केली.

कांदळवन उद्यान

कांदळवन विभागाकडून दहिसर लिंक रोडजवळ कांदळवन उद्यान उभारण्याची योजना आहे. येथील ८० हेक्टर जमिनीवर हे पार्क उभारण्यात येणार आहे. जेट्टीला परवानगी मिळाल्यास पक्षीप्रेमींना बोटीने पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता येईल. बोरिवली, गोराई, दहिसर खाडीत पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता येणार आहे.