मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले असले तरी एकाच फटक्यात २३५ भूखंड (मैदाने) ताब्यात घेऊन तेथे सुविधा देण्याची यंत्रणा पालिकेकडे नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे भूखंड ताब्यात घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पहिल्या टप्प्यात मंगळवारी ३५ भूखंडधारकांवर नोटीस बजावण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ताब्यात घेण्यात येणाऱ्या २३५ भूखंडांपैकी महेश्वरी उद्यान, माटुंगा (लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो), हॉर्निमल सर्कल गार्डन (हॉर्निमल सर्कल गार्डन ट्रस्ट), प्रियदर्शनी पार्क, नेपिअन्सी रोड (मलबार हिल रेसिडन्स फोरम), सीपीआय गार्डन, कफ परेड (द कफ परेड रेसिडन्स असोसिएशन), साधू वासवानी गार्डन (ताल लॅण्ड एण्ड) कृष्णराव राणे मैदान, जुहू (इस्कॉन), माऊंट मेरी रोड गार्डन, वांद्रे (माऊंट मेरी रोड अ‍ॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेन्ट) आदींनी पालिकेबरोबर केलेल्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच ज्यांनी भूखंड घेऊन त्यांचा विकास केला नाही, अशा संस्थांवरही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.