20 October 2020

News Flash

मुंबई : डोळ्यांदेखत बॅग गायब करणाऱ्या ‘जादूगार’ गँगला पोलिसांनी केली अटक

काही मिनिटातच एखाद्याकडील बॅग चोरी करुन गायब करण्यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या जादूगार गँगच्या दोघांना अटक करण्यात आली आहे

प्रातिनिधिक छायाचित्र

काही मिनिटातच एखाद्याकडील बॅग चोरी करुन गायब करण्यासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या जादूगार गँगच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. बॅग चोरी करण्यासाठी ही टोळी सिक्रेट कोड वापरायची. जीआरपीने साडेचार लाखांच्या चोरीचा तपास करताना ही कारवाई केली आहे. नालासोपाऱ्याचा बबलू शेख या गँगचा म्होरक्या आहे. त्याला अटक करण्याआधी जीआरपीच्या विशेष पथकाने अजमेर आणि पहाडगंजमधील ४०० लॉजवर धाड टाकली होती. मुंबईत या टोळीवर २० गुन्हे दाखल आहेत.

१० एप्रिल रोजी शेख आणि त्याच्या साथीदारांनी ब्रोकर चेतन दोशी यांच्याकडील साडेचार लाख रुपयांची लूट केली होती. मस्जिद स्थानकावर फूटओव्हर ब्रीज चढताना त्यांच्याकडील बॅग गायब करण्यात आली होती. शेख याला अटक केल्यानंतर त्याने आपण कशाप्रकारे चोरी करायचो हे सांगितलं. चोरीसाठी टोळीतील प्रत्येक सदस्यावर एक जबाबदारी सोपवलेली असायची असा शेखने खुलासा केला आहे.

‘रफीक याच्याकडे स्टेशनबाहेर उभं राहून टार्गेट निवडण्याची जबाबदारी दिलेली असायची. प्रवाशांच्या देहबोली आणि बॅगवरुन तो टार्गेट निवडत असे’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

रफिक याने चेतन दोशी गोरेगाव स्थानकात शिरताना हातात सफेद रंगाची प्लास्टिक बॅग असल्याचं पाहिलं होतं. यानंतर त्याने शेखला ‘धूर जात आहे’ (हा आपला टार्गेट आहे) असा इशारा दिला. सोबतच रोख रक्कम घेऊन जात असल्याचंही कोड वर्डमध्ये सांगितलं.

चेतन दोशी यांनी सीएसटीला जाणारी ट्रेन पकडली असता टोळीने त्यांचा पाठलाग केला. टोळीतील अजून एक सदस्य फारुख यानेही टार्गेटवर नजर ठेवली होती. मस्जिद स्टेशनला चेतन दोशी उतरताच फूटओव्हर ब्रीजवर त्यांचा पाठलाग सुरु झाला. टोळीतील दोन सदस्य बंटी आण बुलेट यांनी त्यांना घेरलं जेणेकरुन शेख आपलं काम करु शकेल. टोळीतील एक सदस्य विनायक मोकळी बॅग घेऊन तयार होता. त्याने इतरांना तयार राहण्यास सांगितलं.

शेखने चेतन दोशी यांची बॅग खेचली आणि विनायककडे सोपवली. त्याने ती लगेच आपल्या बॅगेत टाकून दिली आणि काहीच झालं नसल्यासारखं चालू लागला. यावेळी फारुख आणि इतर सदस्यांनी एक व्यक्ती दुसऱ्या दिशेला पळत गेला असल्याचं सांगत संभ्रम निर्माण कऱण्याचं काम केलं. यानंतर चेतन दोशी यांनी जीआरपीकडे तक्रार केली.

जीआरपीला टोळी अजमेर दर्ग्याला गेली असल्याची माहिती मिळाली होती. जीआरपीने तेथील २०० ते २५० लॉजवर धाड टाकली मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. टोळीने दिल्लीला पळ काढला होता. पोलिसांनी दिल्लीत जाऊन तेथीलही १०० ते १५० लॉजची पाहणी केली. पण तिथेही काहीच सापडलं नाही. अखेर टीप मिळाल्यानंतर शेखला अटक करण्यात आली. शेखने दिलेल्या माहितीच्या आधारे ठाण्यातून बंटीला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख २ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 2:42 pm

Web Title: grp burst jadugar gang 2 arrested
Next Stories
1 शिवसेनेचा मोदी सरकारवर ‘विश्वास’
2 आंदोलनाचा वणवा पेटण्याआधी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या: धनंजय मुंडे
3 काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, सुशीलकुमार शिंदे समर्थकांची सोलापूरमध्ये तोडफोड
Just Now!
X