खर्चात वाढ, उत्पन्न घटल्याने दुकान मालक संकटात

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : लोकल, बेस्टमधून प्रवासास असलेली बंदी, करोना संसर्गाच्या भीतीपोटी ग्राहकांनी फिरविलेली पाठ, कारागिरांना द्यावा लागणारा महिन्याचा पगार, आठवडय़ातून तीनच दिवसांसाठी दिलेली परवानगी अशा एक ना अनेक प्रश्नांचा कात्रीत मुंबईतील केशकर्तनालये अडकली आहेत.

करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे सर्वच कारभार ठप्प झाला. त्यामुळे अर्थचक्र खोळंबले आणि अर्थसंकट उभे राहिले. अखेर राज्य सरकारने ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ अभियानाची घोषणा करीत मुंबईतील दुकाने सम-विषम पद्धतीने खुली ठेवण्यास परवानगी दिली. मात्र विदेशात केशकर्तनालयांच्या माध्यमातून संसर्ग वाढल्याची काही उदाहरणे पुढे आली. त्यामुळे केशकर्तनालयाला पहिल्या टप्प्यात परवानगी नाकारण्यात आली होती. केशकर्तनाचे काम करणाऱ्या कारागिरांवर हालाखीची परिस्थिती ओढवल्याने अखेर सरकारने अटीसापेक्ष केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी दिली. परिणामी, मुंबईतील बहुसंख्य केशकर्तनालये सुरू करण्यात आली. सरकारने घातलेल्या काही अटी आता मालकांसाठी जाचक ठरू लागल्या आहेत.

लोकल, बेस्ट बसमधून केवळ जीवनावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे मालक आणि कारागिरांना केशकर्तनालयापर्यंत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दूूर राहणाऱ्यांना दामदुप्पट पैसे खर्च करावे लागत आहेत. केशकर्तनालये उघडली असली करोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तुरळक संख्येने ग्राहक येत आहेत. त्यातून दिवसभराचा खर्चही निघत नाही. त्यातच खुर्च आणि अन्य वस्तू निर्जंतूक करण्याचा खर्च वाढला आहे. विशेष म्हणजे तीनच दिवस केशकर्तनालये खुली ठेवण्यास परवानगी आहे. पण कारागिरांना मात्र पूर्ण महिन्याचे वेतन द्यावे लागणार आहे. खर्च आणि उत्पन्नाचे गणित पार बिघडून गेल्याने दुकानाचे मालक अडचणीत येवू लागली आहेत. सरकारने परवानगी दिली असली तरी खर्च वजा होऊन चार पैसे शिल्लक राहात नसल्यामुळे केशकर्तनालय सुरू ठेवायचे की नाही, असा प्रश्न मालकांसमोर उभा राहिला आहे.

करोनाच्या भीतीमुळे ग्राहक येत नाहीत. कशकर्तनाचे दर वाढविण्यात आले असले तरी त्यासोबत खर्चही वाढला आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघडच होत आहे. मात्र तरीही सरकारने दिलेल्या परवानगीनुसार केशकर्तनालये सुरूच ठेवण्याचा निर्णय बहुसंख्य मालकांनी घेतला आहे.

-उदय टक्के, उपाध्यक्ष, ऑल इंडिया हेअर अ‍ॅण्ड ब्युटी असोसिएशन